Nagpur DJ Ban 
नागपूर

Nagpur Ganesh Utsav DJ Ban : नागपूरमध्ये डीजेविना गणेशोत्सवासाठी १३६ गणेश मंडळांचा पुढाकार

डीजे आणि लेझर बीमविरोधातील चर्चेला मंडळांचा प्रतिसाद; हमीपत्रे सादर केल्याची संदीप जोशी यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Ganesh Utsav DJ Ban

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि लेझर बीमच्या वाढत्या वापरावरून सुरू असलेल्या चर्चेला आता गणेश मंडळांकडूनही प्रतिसाद मिळू लागला आहे. शहरातील तब्बल १३६ गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेचा वापर न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील हमीपत्रे सादर केल्याची माहिती माजी विधानपरिषद सदस्य संदीप जोशी यांनी दिली.

तरुणांचा सहभागसकारात्मक संदेश : संदीप जोशी

डीजे आणि लेझर बीमच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून जनचळवळ उभारण्याची भूमिका संदीप जोशी यांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी नागपुरात नागरिकांनी मूकमोर्चा काढत डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध दर्शविला होता. त्यानंतर मंगळवारी जोशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत १३६ गणेश मंडळांनी डीजे न वाजविण्याची भूमिका स्वीकारल्याची माहिती दिली. मंडळांनी स्वतःहून घेतलेला हा निर्णय आणि त्यामध्ये तरुणांचा असलेला सहभाग हा समाजासाठी सकारात्मक संदेश असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.

दक्षिण-पश्चिम, पश्चिम नागपुरातील मंडळांचा लक्षणीय सहभाग

डीजेचा वापर न करण्याचा निर्णय घेतलेल्या १३६ मंडळांच्या यादीत दक्षिण-पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील मंडळांची संख्या लक्षणीय आहे. दक्षिण नागपूर आणि पूर्व नागपूरमधील काही गणेश मंडळांनीही डीजेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या १३६ मंडळांचा सहभाग शहरातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये समान प्रमाणात असल्याचे दिसून येत नाही.

भाजपमध्येही डीजेबंदीवर मतप्रवाह वेगवेगळे

दरम्यान, डीजेबंदीच्या मुद्द्यावर भाजपमध्येही वेगवेगळे मतप्रवाह यापूर्वी समोर आले आहेत. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आणि भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सरसकट डीजेबंदीला विरोध दर्शविला होता. गणेशोत्सवातील पारंपरिक उत्साह आणि ध्वनिव्यवस्थेबाबत त्यांनी यापेक्षा वेगळी भूमिका मांडली होती. त्यामुळे नागपुरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापराचा मुद्दा चर्चेत राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT