Pune Ganesh Visarjan DJ Ban: ‘उत्सव हवा; पण कर्णकर्कश डीजे नको!’ पुणेकरांचा विसर्जन मिरवणुकीविरोधात आक्रमक सूर

कुमठेकर, लक्ष्मी, टिळक, केळकर रस्त्यावरील नागरिकांची मागणी; डीजेवर पूर्ण बंदी किंवा आवाजावर कठोर नियंत्रणाची अपेक्षा
DJ
DJ Pudhari
Published on
Updated on

पुणे: डीजेच्या प्रचंड आवाजामुळे इमारती हादरतात, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना त्रास होतो. त्यामुळे कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता परिसरातील नागरिकांनी डीजेविरोधात आक्रमक भूमिका घेत ‘उत्सव हवा; पण कर्णकर्कश डीजे नको,’ अशी मागणी केली आहे. दैनिक ‘पुढारी’ने प्रमुख विसर्जन मिरवणूक मार्गांवर राहणाऱ्या काही नागरिकांशी संवाद साधला. त्यात काही नागरिकांनी डीजेवर पूर्ण बंदीची मागणी केली, तर काहींनी पारंपरिक वाद्यांच्या वादनाला मंडळांनी प्राधान्य द्यावे, असे म्हटले आहे. बंदी शक्य नसेल तर आवाज अत्यंत कमी ठेवण्याची भूमिकाही नागरिकांनी मांडली आहे. मंडळांनी श्रीगणेश विसर्जन मिरवणूक पारपंरिक पद्धतीनेच काढावी, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

DJ
GST Superintendent Disproportionate Assets Case: ९४.३६ टक्के बेहिशेबी मालमत्ता; GST अधीक्षकाला ४ वर्षे सक्तमजुरी

डॉ. श्रीपाल सबनीस (ज्येष्ठ साहित्यिक, रा. कुमठेकर रस्ता)

नागरिकांना डीजेचा दणदणाट नकोच आहे. श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीतील कर्णकर्कश आवाज आणि त्यातून होणारा अतिरेक स्थानिक नागरिकांसाठी त्रासदायक आहे. डीजेवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. गणेशोत्सव हा भक्तीचा उत्सव आहे. मोठ्या आवाजात गाणी वाजवणे, ही भक्तीची पद्धत होऊ शकत नाही. डीजेला पारंपरिक ढोल-ताशावादन चांगला पर्याय आहे. पारंपरिक ढोल-ताशांना माझा विरोध नाही. मात्र, आधुनिकतेच्या नावाखाली आरोग्याला धोका निर्माण करणारा डीजे स्वीकारता येणार नाही. परंपरेचा गाभा जपत नव्याचे स्वागत करावे; घातक गोष्टींना उत्सवाच्या नावाखाली प्रोत्साहन देऊ नये.

DJ
Pune DJ Noise Hearing Loss: डीजेचा दणदणाट ठरतोय ‘सायलेंट किलर’; तरुण पिढीला भविष्यात बहिरेपणाचा धोका!

किशोर सरपोतदार (संचालक, पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रस्ता)

लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या विसर्जन मिरवणुकांमधील डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आवाजामुळे इमारती हादरतात, तर गणेशोत्सवामध्ये आमच्याकडे राहायला येणाऱ्या पाहुण्यांची संख्याही कमी झाली आहे. मिरवणुकीमुळे रस्ते बंद असल्याने आपत्कालीन प्रसंगी रुग्णाला डॉक्टरकडे नेणेही कठीण होते. उत्सव साजरा व्हायलाच हवा; मात्र मोठ्या आवाजात डीजे वाजवणे आवश्यक नाही. पारंपरिक वाद्यांतूनही उत्साह टिकवता येतो. डीजेवर पूर्ण बंदीऐवजी त्याचा आवाज अत्यंत कमी आणि नियंत्रित ठेवावा. उत्सवाबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा आणि दैनंदिन जीवनाचा विचार करणे गरजेचे आहे.

DJ
Pune Ganeshotsav Sound System Ban: गणेशोत्सवात कर्णकर्कश आवाजाला लगाम; प्लाझ्मा, प्रेशर मीडवर बंदी कायम

प्रमोद पाठक (नोकरदार, रा. कुमठेकर रस्ता)

गणेशोत्सवातील डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे सदाशिव पेठ, शनिवार पेठ आणि नारायण पेठेतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आमच्या घरासमोरील ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मिरवणुकीदरम्यान हृदयविकाराचा झटका आला. मोठ्या आवाजातील मिरवणूक आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना वेळेत रुग्णालयात नेता आले नाही आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांच्या आरोग्यावर डीजेचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे गणेशोत्सवातील डीजेला आमचा पूर्णपणे विरोध आहे. उत्सव साजरा करताना नागरिकांचे आरोग्य आणि शांतता जपली पाहिजे.

DJ
Pune Ganeshotsav: हा उत्सव कुणाचा..?

डॉ. अनुराधा पंडितराव (शास्त्री रस्ता)

विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या मोठ्या आवाजाचा नागरिकांना त्रास होतो. मात्र, लोकांचा उत्साह आणि सण साजरा करण्याची भावना लक्षात घेता डीजेचा मिरवणुकांमध्ये वापर सुरू ठेवण्यास माझा विरोध नाही. पण, डीजेचा आवाज अत्यंत कमी आणि मर्यादित असावा. मोठ्या आवाजामुळे भिंती थरथरतात आणि कानांवर विपरीत परिणाम होतो. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होतो. डीजेच्या स्पीकरचे थर लावून मोठ्या आवाजात वादन करण्यास आळा घालावा. लेझर लाइट्समुळे डोळ्यांना धोका असल्याने त्या टाळाव्यात. उत्साहासोबत नागरिकांचे आरोग्यही जपले पाहिजे.

अरविंद रावेतकर (रा. टिळक रस्ता)

विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. विशेषतः लहान मुले, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मोठ्या आवाजामुळे श्रवणक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकार आणि न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. डीजेवर पूर्णपणे बंदी घातली तर अधिक चांगले होईल. सोलापूरप्रमाणे पुण्यातही नागरिकांनी एकत्र येऊन डीजेमुक्त उत्सवासाठी पुढाकार घ्यावा. पूर्ण बंदी शक्य नसल्यास डीजेचा आवाज अत्यंत कमी ठेवावा. उत्सवाबरोबर नागरिकांचे आरोग्य आणि शांतताही जपली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news