Nagpur Murder Case : गणेश बोरकर खून प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करुन त्‍याच्‍या पत्‍नीसह एकाला अटक केली आहे.  Pudhari
नागपूर

Nagpur Murder Case : नागपूरमधील 'त्या' खुनाचे गूढ उकलले! स्वतःच्या जिवाच्या भीतीने पत्नीनेच दिली पतीच्या खुनाची सुपारी

गणेश बोरकर खून प्रकरणी दोघे गजाआड, नागपूर पोलीस आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Murder Case

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : येथील भांडेवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या गणेश बोरकर याच्याखुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत गणेशच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आणि त्रासाला कंटाळून, स्वतःच्या जिवाच्या भीतीने त्याच्या पत्नीनेच ही सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी नागपूर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य सूत्रधार पत्नीसह एका संशयित आरोपीला अटक करण्‍यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी झाली होती हत्या

दोन दिवसांपूर्वी भांडेवाडी परिसरात अज्ञात मारेकऱ्यांनी गणेश बोरकरची धारदार शस्त्राने हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा खून जुन्या वैमनस्यातून किंवा गुन्हेगारी टोळीच्या वादातून झाला असावा, असा संशय होता.

पत्‍नीला दिली होती जीवे मारण्‍याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेश बोरकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती होता. त्याच्या सततच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून पत्नी निशा आपल्या मुलासह पतीला सोडून माहेरी राहत होती. मात्र, माहेरी गेल्यानंतरही गणेशचा त्रास कमी झाला नव्हता. त्याने निशाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वारंवार मिळणाऱ्या धमकीमुळे निशाने स्वतःच्या जिवाच्या सुरक्षेसाठी पतीचा काटा काढण्याचा कट रचला. आरोपी अभिजित सहारे व त्याच्या साथीदाराला गणेश या दोघांना हत्येची सुपारी दिली होती.

असा झाला गुन्ह्याचा पर्दाफाश

नागपूर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि संशयितांची चौकशी केली असता, पोलिसांचा संशय निशा बोरकरवर बळावला. तिची सखोल चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठीच आपण पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

पत्नीसह एका संशयिताला अटक, एकाचा शोध सुरु

गणेश बोरकरच्‍या खूनप्रकरणी निशा गणेश बोरकर आणि अभिजित सहारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या हत्येमध्ये आणखी एका आरोपीचा सहभाग असून, तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फरार असलेल्या दुसऱ्या मारेकऱ्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT