

Crime Detection Yawal Jalgaon
जळगाव : अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून खुनाचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांचा यावल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अवघ्या काही दिवसांत सखोल तपास करत पोलिसांनी खुनाचा छडा लावला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
१८ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजता पवन रविंद्र सोळंके (वय २६, रा. कोळन्हावी, ता. यावल) याला मृतावस्थेत ग्रामीण रुग्णालय, यावल येथे आणण्यात आले होते. याप्रकरणी उमेश दिलीप परदेशी याने दिलेल्या फिर्यादीत, डांभुर्णी शिवारात लघुशंकेसाठी थांबलेल्या पवनला अज्ञात ट्रकची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यानुसार यावल पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना अपघात झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत. विशेषतः कथित अपघातस्थळी रक्ताचे डाग किंवा संघर्षाच्या खुणा नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. तपासाची दिशा बदलत पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता किनगाव-डांभुर्णी रस्त्यालगतच्या हातनूर कालव्याजवळील सिमेंट काँक्रीटवर रक्ताचे डाग आणि थारोळे आढळून आले. काही ठिकाणी रक्त झाकण्यासाठी माती टाकण्यात आल्याचेही निदर्शनास आले.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने फिर्यादी उमेश परदेशी आणि त्याच्या सहकाऱ्यांची पुन्हा कसून चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी मृत्यू अपघातामुळे नसून कालव्यात पडल्यामुळे झाल्याचा दुसरा बनाव सांगितला. मात्र घटनास्थळावरील भौतिक पुरावे, फॉरेन्सिक तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सखोल चौकशी केली.
अखेर उमेश दिलीप परदेशी (वय ३२, रा. कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी (वय ३२, रा. डांभुर्णी, सध्या शिक्रापूर, पुणे) आणि लोकेश दिवाकर महाजन (वय ३२, रा. डांभुर्णी) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १७ जूनच्या रात्री पवन सोळंके याला दारू पाजून हातनूर कालव्याजवळ नेण्यात आले. तेथे त्याच्या डोक्यात दगडाने वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने रक्ताच्या थारोळ्यावर माती टाकण्यात आली तसेच घटनास्थळावरील चप्पल हटवून अपघाताचा बनाव रचण्यात आला.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), २३८, २३९ आणि ३(५) अंतर्गत वाढीव कलमे लावण्यात आली असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाडवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन तसेच यावल पोलीस ठाण्याच्या पथकाने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
तपासातील बारकावे, तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे अपघाताचा बनाव उधळून लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यावल पोलिसांना यश आले असून जिल्हाभर या कारवाईची चर्चा सुरू आहे.