Crime News Pudhari
नागपूर

Nagpur News: नागपूरमध्ये माजी आमदाराच्या भाडेकरूचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; पत्नी आणि मुलामुळे वाचला जीव!

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी नगर परिसरात माजी आमदाराच्या घरी रिकाम्या खोलीत एका व्यक्तीने मंगळवारी सकाळी गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.

पुढारी वृत्तसेवा

Nagpur News

नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी नगर परिसरात माजी आमदाराच्या घरी रिकाम्या खोलीत एका व्यक्तीने मंगळवारी सकाळी गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. पत्नी आणि मुलाच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेत संबंधित व्यक्तीला खाली उतरविले. त्यानंतर पत्नी व पुतण्याने त्याला ऑटोमधून रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती पत्नी व मुलासह जानकी नगर येथील माजी आमदारांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहतो. त्याच्या शेजारील खोलीत पूर्वी एक भाडेकरू राहत होता. मात्र, संबंधित भाडेकरूने नुकतीच खोली रिकामी केली होती. याच रिकाम्या खोलीत आज सकाळी संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पत्नी व मुलाच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून तातडीने त्याला खाली उतरविले. त्यानंतर पत्नी व पुतण्याने वेळ न दवडता त्याला ऑटोमधून जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक चौकशी सुरू केली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. संबंधित व्यक्ती खासगी काम करीत असून त्याची पत्नी घरकाम करते, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, संबंधित व्यक्ती नुकताच गावाहून परतला होता. गावाहून परतल्यानंतर तो काही दिवसांपासून तणावात असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्याच्या तणावामागील नेमके कारण काय होते आणि त्याने टोकाचा निर्णय का घेतला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. या घटनेमुळे जानकी नगर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. हुडकेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून संबंधित व्यक्तीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याच्याकडून घटनेमागील कारणाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT