राजेंद्र उट्टलवार
नागपूर : अखेर अपेक्षेप्रमाणे चौथ्यांदा उपराजधानीतील नागपूर महापालिकेत भाजपची बहुमतासह सत्ता आली. विकासाचे कमळ फुलले. मात्र, भाजपने 120 जागांचा तर काँग्रेसने मिशन 100 असे केलेले दावे काही प्रभागातील बंडखोरी, एमआयएमच्या धक्कादायक निकालांनी फसले.
शहरातील दहा झोनच्या मतमोजणी केंद्रावर आज शुक्रवारी सकाळी सुरू झाली. चार सदस्यीय प्रभाग असल्याने सायंकाळी 6 पर्यंत निकाल फारसे जाहीर झालेले नसले तरी भाजप बहुमतासह पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट झाले. गेल्यावेळी 108 जागा मिळाल्या. यावेळी 120 जागांचा दावा केला गेला मात्र तो फसला. शिंदे सेनेला आठ जागा दिल्या गेल्या.
मात्र, यातील पाच उमेदवार भाजपचेच होते. 32 लोकांना पक्षाने निलंबित करूनही काही ठिकाणी बंडखोरीचा फटका बसल्याचे आकडे सांगतात. दुसरीकडे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळत बहुतांशी प्रभागात काँग्रेस - भाजप अशा थेट लढती झाल्या. काँग्रेसला फायदा झाला. अनपेक्षितपणे एआयएमआयएम आणि मुस्लिम लीगने धक्कादायक विजय नोंदवित काँग्रेस,भाजपला दूर सारले. गेल्यावेळी बसपाला दहा जागा मिळाल्या यावेळी बसपा,वंचित,आपची पिछेहाट दिसली.
काँग्रेसने नवख्या उमेदवारांच्या माध्यमातून स्वबळावर लढत भाजपला थेट लढत दिली. महायुतीत शिवसेना शिंदे गटाची जागावाटपासोबतच निकालातही घसरण झाली. उबाठाने दोन परंपरागत जागा जिंकल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसची,घड्याळाची टिकटिक पुन्हा एकमेव विजयाने निष्प्रभ ठरली. शरद पवार गटाची तुतारी स्वतंत्र लढूनही वाजली नाही. माजी आमदार प्रकाश गजभिये शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे पराभूत झाले. आप,एमआयएमने काही प्रभागात निर्णायक क्षणी आश्चर्यकारकरित्या मारलेली जोरदार मुसंडी राजकीय पक्ष, विश्लेषकांना देखील विचार करायला लावणारी ठरली.
काय आहे संभाव्य संख्याबळ ?
सायंकाळी सातच्या सुमारास नागपुरात 38 प्रभागातील एकंदर 151 जागांपैकी भाजप 103 (गेल्यावेळी 108 जागा) काँग्रेस 33 (गेल्यावेळी 29) ,शिवसेना शिंदे गट 2, उबाठा शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा 1 आणि प्रथमच निवडून आलेले एआयएमआयएम 7, मुस्लिम लीग 4 अशी आघाडी कायम होती. अनेक प्रभागात भाजप काँग्रेस काट्याची लढत सुरू होती.