Nagpur Drunk Woman Driver Hits Seven: नागपूर शहरातून एक मोठी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरमधील गोरेवाडा परिसरातील दिनशॉ फॅक्टरीजवळ काल रात्री एका भरधाव सेल्टॉस कार चालवणाऱ्या महिला चालकाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मद्यधुंद महिला कार चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल सात जणांना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. या भीषण अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून, या घटनेमुळे नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या झोन २ च्या पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांच्या अधिकारक्षेत्रात ही दुर्घटना घडली. रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या सेल्टॉस कारने सुरुवातीला बालू कुलमेथे यांच्या एसयूव्हीला जोरदार धडक दिली. ही धडक दिल्यानंतर कारवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि चालकाने वाहन थेट रस्त्यावरील नागरिकांच्या अंगावर घातले. या अनियंत्रित कारने रस्त्यावरून चाललेल्या तीन चिमुकल्या मुलांना उडवले, तसेच हरीश रेवतकर आणि आशीष नखाते या नागरिकांनाही गंभीर स्वरूपात धडक दिली.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्यक्षदर्शींच्या मते, कार चालवणारी महिला नशेत असल्याचा संशय असून घटनास्थळी याबद्दलची जोरदार चर्चा सुरू होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोषी महिला चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच अपघातावेळी कारमध्ये आणखी कोण-कोण व्यक्ती उपस्थित होते, याचा कसून तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून घटनेची सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंग म्हणाल्या की, आम्हाला किया गाडी चालवत असणाऱ्या एका ३२ वर्षाच्या महिलेने ४ लोकांना हिट केल्याची माहिती मिळाली. आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहचलो. त्यानंतर आम्ही महिला चालकाला ताब्यात घेऊन सेफ कस्टडीसाठी पोलीस ठाण्यात आणलं आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तिची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिने अमली पदार्थांचे सेवन केलं होतं की नाही हे स्पष्ट होईल अशी माहिती दिली.
दरम्यान, या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्याला घेराव घातला. निष्पाप लोकांच्या आणि चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून अपघात करणाऱ्या संबंधित महिला चालकावर तातडीने आणि अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढून या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.