Nagpur Sports Complex Fund
नागपूर: नागपूर जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी १०० कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, या प्रकल्पामुळे नागपूरमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत
नागपूरच्या क्रीडा विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
नागपूर जिल्हा क्रीडा संकुल हे आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय निकषांनुसार विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये ३०० मुलांसाठी व ३०० मुलींसाठी स्वतंत्र सुसज्ज वसतिगृहे, बहुउद्देशीय इनडोअर हॉल, २० मीटर व ५० मीटर शूटिंग रेंज, ४०० मीटर सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक, हॉकीसाठी अॅस्ट्रोटर्फ मैदान, सिंथेटिक बास्केटबॉल कोर्ट, ७० मीटर आर्चरी रेंज, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल मैदाने, मिनी गोल्फ सुविधा, आधुनिक व्यायामशाळा, सौर ऊर्जा प्रकल्प, चेंजिंग रूम, पाणीपुरवठा व्यवस्था आणि इतर अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाला २० मे २०२६ रोजी उच्चस्तरीय सचिव समितीची मंजुरी मिळाल्यानंतर २५ जून २०२६ रोजी राज्य मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली होती. त्यानंतर आता शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शासनाने प्रकल्पातील विशेष तांत्रिक कामांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी मुख्य कंत्राटदाराने अनुभवी क्रीडा क्षेत्रातील कंत्राटदारासोबत संयुक्त उपक्रम (जॉइंट व्हेंचर) करूनच निविदा सादर करणे आवश्यक केले आहे. त्यामुळे प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जानुसार उभारला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नागपूरच्या क्रीडा विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाल्याचे बावनकुळे यांनी आवर्जून नमूद केले. नागपूरची ओळख आधुनिक क्रीडा सुविधांनी सज्ज असलेल्या देशातील प्रमुख क्रीडा केंद्रांपैकी एक म्हणून अधिक मजबूत होण्यास या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. विदर्भातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. विदर्भातील हजारो खेळाडूंना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.