

नागपूर : पैसा मोठा की माणूस असे प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना सध्या समोर येत आहेत. दोन वेळा चहा घेतला, पैसे दिले नाही, म्हणून केवळ दहा रुपयांसाठी एका चहावाल्याने सपासप चाकूने वार करून एका कामगाराची हत्या केली. ही थरारक घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उप्पलवाडी मार्गावरील मौजा नारी भागात घडली. या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक केली. मनोज विश्वनाथ यादव (वय ५०, रा. दर्शन कॉलनी) असे मृतकाचे तर कैलास लालचंद गणवीर (वय ४५, रा. न्यू म्हाडा बिल्डिंग) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मौजा नारी भागात कैलास याचा चहाचा ठेला आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी) अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्प भूमिपूजन कार्यक्रम झाला. दोन दिवसांपासून मंडप उभारण्याचे काम सुरू होते. येथे यादव हा काम करीत होता. येथून काही अंतरावर कैलासचा चहाचा ठेला आहे. त्याने दोन वेळा कैलासच्या ठेल्यावर चहा प्यायला. मात्र, त्याला पैसे दिले नाहीत. रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास यादव हा पुन्हा चहा पिण्यासाठी गेला.
कैलासने यादव याला उधारीचे दहा रुपये मागितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला. संतप्त कैलासने दुकानातील चाकू घेत यादवच्या मानेवर दोन वार केले. रक्ताच्या थारोळ्यात यादव खाली कोसळला. याच ठिकाणी तैनात पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमी यादवला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करून कैलास याला अटक केली. डॉक्टरांनी तपासून यादवला मृत घोषित केले.