

नागपूर : शेतातून गायी-म्हशींचे दूध धार काढून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत दूधवाले काशीराम इरदंडे गंभीर जखमी झाले. दरम्यान दुग्ध व्यावसायिक व शेतकरी काशीराम इरदंडे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगातही त्यांच्या कुटुंबाने धाडसी निर्णय घेत, काशीराम यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड (किडनी) आणि दोन्ही बुब्बुळे (कॉर्निया) दान केले. त्यांच्या या मरणोत्तर अवयवदानामुळे पाच गरजू व्यक्तींना जीवदान मिळाले.
भिवापूर तालुक्यातील उखळी येथील रहिवासी काशीराम इरदंडे नेहमीप्रमाणे शेतातून धारा काढून घरी परतत असताना पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने भिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
प्रकृती आणखी खालावत गेल्याने त्यांना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात डॉ. सोमा चाम यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि उपचार करूनही त्यांच्या मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या न्यूरोलॉजिकल स्थिती अत्यंत खालावली.
पुढे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात ब्रेन स्टेम डेथ समितीने सर्व वैद्यकीय व कायदेशीर निकषांची पूर्तता करत त्यांना मेंदूमृत घोषित केले. अवयव प्रत्यारोपण समन्वयक डॉ सुमित चाहाकर,धीरज कुर्वे यांनी मार्गदर्शन केले. कांशीराम यांची पत्नी वर्षा,मुली भाग्यश्री, हिमांशी,भाऊ कैलास आणि सर्वांनी होकार देताच अवयवदान स्थानिक रुग्णालयांमध्ये पार पडले.