Nagpur Cultural News
नागपूर - सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह नूतनीकरणाचे काम अखेर २० वर्षानंतर जोरात सुरू झाले आहे. 11 कोटी 7 लाख रुपये खर्च करून या सभागृहाचा मेक ओव्हर केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आमदार निवास समोर , दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या अगदी शेजारी 1986 मध्ये हे सभागृह तयार करण्यात आले. 2005 मध्ये पहिल्यांदा नूतनीकरण करण्यात आले.
नागपूरच्या सांस्कृतिक विभागात भर टाकणाऱ्या या सभागृहात खूप मोठ मोठ्या नामवंत कलावंतांनी आपली सेवा रुजू केली आहे. याशिवाय सर्वपक्षीय बड्या नेत्यांच्या सभा,राजकीय पक्ष मेळावे देखील याच सभागृहात झाले आहेत. गेल्या काही वर्षात रेशीमबाग परिसरात सुरेश भट सभागृह झाल्यामुळे कलाप्रेमींसाठी एक भक्कम पर्याय उपलब्ध झालेला आहे. डॉ पंजाबराव देशमुख सभागृहाचे देखील काम सुरू आहे. वर्षभरापासून देशपांडे सभागृहाची वातानुकूलित यंत्रणा बंद पडली होती. पंखे लावून काही कार्यक्रम घेण्यात आले.
आता लवकरच नव्या रूपात हे सभागृह सुसज्ज होत रसिकांच्या सेवेत येणार आहे. साधारणतः जून महिन्यापर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यात वातानुकूलित यंत्रणा अपडेट करणे, भिंतींना नवे रूप देणे, सिलिंगचे काम, स्टेज फ्लोरिंग लाकडाचे करणे ही कामे करण्यात येत आहेत. यासोबतच रसिकांसाठी स्वच्छतागृहाचे काम, अग्निशमन यंत्रणा बसविणे, विद्युत उपकरणे अशी कामे या आधुनिकीकरणात केली जात आहेत. सध्या नागपुरात सुरू असलेल्या नाट्य संमेलनात ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी नाट्य कलावंतांसाठी, तालमीसाठी छोट्या नाट्यगृहाची गरज व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर देशपांडे सभागृह लवकरच नव्या रूपात पहायला मिळावे ही रसिकांची इच्छा आहे.