नागपूर

Nagpur Crime : दुकान फोडून १.७० लाखांची चोरी; दोन अल्पवयीनांसह ५ जण पोलिसांच्या जाळ्यात, ७० हजारांची रोकड हस्तगत

सीसीटीव्ही फुटेजने दिला सुगावा; 'छोटा कालू' टोळीचा तहसील पोलिसांकडून पर्दाफाश

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोळीबार चौक परिसरात दुकान फोडून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यात दोन विधीसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) मुलांचा समावेश आहे. आरोपींकडून चोरीच्या रकमेपैकी ७० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

गोळीबार चौक, टिमकी तीनखंबा परिसरातील खापरे मोहल्ला येथे मोहम्मद शहबान अन्सारी यांचे ‘रोमन ट्रेडर्स’ नावाचे दुकान आहे. ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता अन्सारी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ७ वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असता, दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून काउंटरमधील सुमारे १ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. याबाबत तक्रार दाखल होताच तहसील पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली.

पोलिसांनी घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. त्यातून मिळालेल्या महत्त्वाच्या धागेदोऱ्यांच्या आधारे वेदांत ऊर्फ छोटा कालू विकास चाटे, हिमांशू विकास चाटे आणि विनीत ऊर्फ काल्या कुन्हाडकर यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्यांनी दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून ७० हजार रुपयांची रोकड जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT