

Rudra Dairy Farm Police Raid
नागपूर: नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गादा-नेरी मार्गावरील गादा शिवारातील रुद्र डेअरी फार्मवर परिमंडळ क्रमांक ६ च्या विशेष पथकाने छापा टाकून ११० गोवंशीय पशूंची सुटका केली. हे पशू चारा-पाण्याविना निर्दयीपणे बांधून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत सुमारे १९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, डेअरी फार्मच्या संचालकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना रुद्र डेअरी फार्ममध्ये परवानगीशिवाय गोवंशीय पशूंना कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने डेअरी फार्मवर छापा टाकला. त्यावेळी ११० गोवंशीय पशू बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.
दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच डेअरी फार्मचा संचालक आणि अन्य आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी सर्व पशूंची सुरक्षित सुटका करून त्यांना पारडी येथील गोरक्षण केंद्रात हलविले.
या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात डेअरी फार्मच्या संचालकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान सुमारे १९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्रमांक ६ रमेश धुमाळ आणि सहायक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास तिडके व विशेष पथकाने केली.