Nagpur Crime News: नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या १० वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच सावत्र वडिलांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या शरीरावर संशयास्पद खुणा दिसल्यानंतर आईला पतीच्या वागणुकीवर संशय आला.
त्यानंतर तिने घरात गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा लावला. या कॅमेऱ्यातील फुटेजमुळे संपूर्ण प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूरमधील पाचपावली परिसरात घडली. पीडित मुलगी अवघ्या १० वर्षांची आहे. काही दिवसांपासून मुलीच्या शरीरावर संशयास्पद खुणा दिसत होत्या. त्यामुळे आईला काहीतरी चुकीचे घडत असल्याची शंका आली. तिने पतीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. मात्र, नेमका प्रकार काय आहे, हे तिच्या लक्षात येत नव्हते.
अखेर सत्य समोर आणण्यासाठी आईने घरातील टीव्हीच्या मागे कोणालाही न कळता सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. या कॅमेऱ्याचे लाईव्ह फुटेज पाहण्याची व्यवस्था तिने आपल्या मैत्रिणीच्या मोबाईलवर केली होती. जवळपास वर्षभर घरातील हालचालींचे रेकॉर्डिंग सुरू होते.
या रेकॉर्डिंगमध्ये सावत्र वडिलांकडून मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आईने मुलीकडे विचारणा केली. त्यावेळी मुलीने आपल्यासोबत वारंवार अत्याचार झाल्याची माहिती दिली. आरोपीने या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे भीतीपोटी मुलगी इतके दिवस शांत राहिली होती.
मुलीने सांगितलेला प्रकार ऐकल्यानंतर आईने तातडीने पाचपावली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, गंभीर लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे नागपूरमध्ये संताप व्यक्त केला जात असून, आईने दाखवलेल्या धैर्यामुळे चिमुरडीवर होणारा अत्याचार उघडकीस आला आहे.