Stray Dog Attack Nagpur
नागपूर : भटका कुत्रा अंगावर धावून आला म्हणून त्याच्यापासून बचावासाठी बारा वर्षे वयाचा एक मुलगा धावत धावत बिल्डिंगच्या सहाव्या माळ्यावर गेला. मात्र, श्वान तिथेही पोहोचल्याने घाबरलेल्या मुलाचा सहाव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. ही घटना कळमना पोलीस ठाण्याचे हद्दीत पावनगाव येथील देव हाइट्स मध्ये घडली. जयेश रवींद्र बोकडे असे मृत मुलाचे नाव आहे.
प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 12 वर्षांचा जयेश त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. त्याच्या हातात काठीदेखील होती. याच दरम्यान परिसरातील भटका कुत्रा त्याच्या अंगावर धावून गेला. घाबरलेला जयेश इमारतीच्या जिन्यावरून सहाव्या मजल्यापर्यंत पळत गेला. मात्र, भटका कुत्रा तिथेही पोहोचला. नेमकं यादरम्यान जयेश जिन्यामधील पोकळीतून खाली पडला. हात, पाय आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झालेल्या जयेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कलमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत जिन्यामधील पोकळीच्या वृत्ताला दुजोरा दिला. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, इमारतीमधील सुरक्षा व्यवस्था, बांधकामातील त्रुटी अशा सर्वच बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले.
शहरातील भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय तालेवार यांनी दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. न्यायालयाने मोकाट श्वानांच्या नसबंदीचे व इतरही उपाययोजनांबाबत आदेश दिले. मात्र, शेल्टरसाठी जागा निश्चितीची प्रक्रिया देखील थंड बस्त्यात आहे. अनेकदा रस्त्यावर मोकाट श्वानामुळे अपघात होतात. लोक जखमी होतात अनेकाना जीव गमवावा लागतो. मात्र, याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्षच आहे.