

Wife Kills Sick Husband in Nagpur
नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या आणि अर्धांगवायू झाल्याने अंथरुणावर असलेल्या पतीला गळा दाबून प्रियकराच्या मदतीने पत्नीने यमसदनी धाडल्याची घटना वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत साईनाथ सोसायटीत उघडकीस आली. चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके असे मृताचे तर पत्नीचे नाव दीक्षा रामटेके असे आहे. तिने प्रियकर आसिफ राजा इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला याच्या मदतीने पतीची हत्या केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, या दोघांचे विवाहबाह्य संबंध होते. पती अर्धांगवायू असल्याने दीड वर्षापासून अंथरुणावर होता. गेल्या काही दिवसात त्याच्या प्रकृतीत सुधारणा देखील होती. रामटेके दांपत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. पत्नी दीक्षाने आरओ वॉटर कॅन्सचा व्यवसाय सुरू केला होता. चंद्रसेनला या दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली असता त्याने समजूत घालण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तो व्यर्थ ठरला.
पती पत्नीत वाद होऊ लागले. अखेर दीक्षाने आपल्या प्रियकराच्या मदतीने तोंडावर उशी दाबून चंद्रसेनला संपविले. श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याचा सतत आजारी असल्याने हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा स्वतः कांगावा केला. चंद्रसेन यांचा भाऊ संजय आणि काही शेजारी लोकांना हा बनाव पटला नाही. भावाने पोलिसांत तक्रार केली. अखेर शव विच्छेदन अहवालात तोंड दाबल्याने श्वास कोंडून त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. पोलिसांनी संशयावरून पत्नी दीक्षा आणि तिचा प्रियकर आसिफ याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच दोघेही बोलायला लागले आणि त्यांनी हत्येची कबुली देताच दोघांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.