नागपूर : नागपूर विभागात शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या, नियमबाह्य मान्यता, शालार्थ आयडी घोटाळा अशा गंभीर प्रकरणांची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता एसआयटी चौकशीचे संकेत आहेत. विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्याची मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी “तपासून कार्यवाही करावी” अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
यानुसार शिक्षण विभागातील तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणांची चौकशी सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करून तातडीने शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त (महाराष्ट्र राज्य, पुणे) यांना देण्यात आल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यात बोगस शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती प्रकरणाचा मोठा घोटाळा गेले काही दिवस माध्यमातून चर्चेत आहे. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला असून तपासादरम्यान शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह इतर तीन अधिकारी/कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान या अधिकाऱ्यांकडून गंभीर स्वरूपाची माहिती समोर येत असून नागपूरसह राज्याच्या इतर भागातूनही बोगस नियुक्त्या व शालार्थ आयडी घोटाळ्यांबाबत तक्रारी समोर येत आहेत.
शिक्षण विभागातील हा घोटाळा नागपूर विभागापुरता मर्यादित नसून त्याची व्याप्ती राज्यभर आहे. ही बाब लक्षात आणून देत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेतली असून कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू झाली आहे.