

नागपूर : शिक्षक नियुक्ती घोटाळ्यात अटक करण्यात आलेला सहावा आरोपी महेंद्र म्हैसकर हा बनावट कागदपत्रे बनवण्यासाठी महत्त्वाचा माणूस असून त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे 22 बोगस प्रस्ताव आणि बनावट कागदपत्रे आढळले आहेत. महेंद्र म्हैसकरच्या संपर्कात कोण कोण होते, त्याचे ट्रांजेक्शन, सीडीआर आणि कागदपत्रे सगळे तपासणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.
प्रस्तावाच्या माध्यमातून तसेच अन्य बोगस पुराव्याच्या अनुषंगाने काही लोकांना नोटीस देऊन चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावले असल्याचे मदने यांनी सांगितले. दरम्यान, महेंद्र म्हैसकरचे ज्याच्याशी संबंध आले किंवा ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार केले त्या सगळ्याचा तपास केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. महेंद्र म्हैसकर हा भंडारा येथील मोरगाव अर्जुनी येथे इंग्रजी अनुदानित शाळेत शिक्षक आहे. त्याने काही लोकांच्या मदतीने बोगस कागदपत्रे तयार केली आहेत. त्याच्याजवळून लॅपटॉप, कॉम्प्युटर जप्त केले आहेत. अनेक संस्था चालकांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. बोगस कागदपत्रे बनवण्याच्या कामात तो सतत गुंतलेला असायचा असे पुरावे सापडले आहेत.
याशिवाय अन्य कोणी मदत केली आहे हे तपासले जाणार आहे. या घोटाळ्यात शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद आणि शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयातील लोकांचा सहभाग आहे त्याचीही चौकशी सुरू आहे. यासोबतच भंडारा येथे सुद्धा चौकशी केली जात आहे. यासोबतच उप शिक्षण उपसंचालक यांच्याही कार्यालयाची चौकशी सुद्धा सुरू आहे. यामध्ये आणखी कुणाकुणाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग दिसून येत आहे, त्या लोकांची आम्ही चौकशी करीत आहोत असेही मदने यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.