Nagpur birth certificate delay Pudhari
नागपूर

Nagpur News : मुख्यमंत्र्यांच्या शहरात जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी महिनाभर पायपीट!

सीआरएस पोर्टलमधील नव्या नियमांचा फटका; तांत्रिक बिघाडामुळे हजारो नागरिकांची गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

Nagpur birth certificate delay

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू केलेल्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम (सीआरएस) पोर्टलमधील अलीकडील बदलांमुळे नागपूरमध्ये नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एका युजर आयडीवरून फक्त एकाच संगणकावर काम करण्याची अट, पोर्टलमधील वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि बदललेली पडताळणी प्रक्रिया यामुळे जन्म व मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी आता सात दिवसांऐवजी तब्बल महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

पोर्टलमधील बदलांमुळे नोंदणी प्रक्रिया झाली संथ

राज्य शासनाने १ जुलै २०२३ पासून सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम (सीआरएस) सुरू केली. या प्रणालीचा उद्देश जन्म आणि मृत्यूची नोंद जलद गतीने करून नागरिकांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा होता. मात्र, सुमारे महिनाभरापूर्वी पोर्टलमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे नोंदणी प्रक्रिया संथ झाली आहे.

प्रलंबित अर्जांचा ढीग

पूर्वी एका युजर आयडीवरून तीन ते चार संगणकांवर एकाच वेळी काम करता येत असल्याने दररोज जन्म आणि मृत्यूच्या प्रत्येकी ७० ते ८० नोंदी होत होत्या. आता एका लॉगिनवर केवळ एकाच संगणकावर काम करण्याची मर्यादा घालण्यात आल्याने ही संख्या २५ ते ३० पर्यंत घसरली आहे. त्यामुळे अर्जांचा प्रलंबित ढीग वाढत असून नागरिकांना अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.याशिवाय, सीआरएस पोर्टल अनेकदा देखभाल, सर्व्हर डाऊन किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे तासनतास बंद राहत असल्याने नोंदणीचे काम पूर्णपणे ठप्प होते. मेडिकल, मेयोसह इतर शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून अनेकांना महिनाभर प्रमाणपत्राची वाट पाहावी लागत आहे.

अतिरिक्‍त विलंबाचे कारण काय?

यापूर्वी संबंधित रुग्णालयातच कागदपत्रांची पडताळणी, नोंदणी आणि प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया पूर्ण होत होती. मात्र, नव्या पद्धतीनुसार रुग्णालयात केवळ प्राथमिक नोंद केली जाते. त्यानंतर संपूर्ण माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवली जाते. तेथून मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित रुग्णालयातून प्रमाणपत्र दिले जात असल्याने प्रक्रियेत अतिरिक्त विलंब होत असल्याचे कर्मचारी सांगतात.

हजारो नागरिकांना अटीचा फटका

नागपूर जिल्ह्यातील ७६१ ग्रामपंचायती, २९ नगरपालिका व नगरपंचायती, नागपूर महानगरपालिका क्षेत्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच ५०० हून अधिक खासगी रुग्णालयांमधून जन्म व मृत्यू नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. या सर्व केंद्रांमधून प्रमाणपत्र घेणाऱ्या हजारो नागरिकांना सध्या या बदलेल्‍या अटीचा फटका बसत आहे. पूर्वीप्रमाणे एका युजर आयडीवरून एकापेक्षा अधिक संगणकांवर काम करण्याची सुविधा पुन्हा सुरू करावी, सीआरएस पोर्टलमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात आणि पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशी मागणी कर्मचारी आणि नागरिकांकडून होत आहे.

पूर्वी एका लॉगिनवर तीन ते चार संगणकांवर काम करणे शक्य होते. आता एका लॉगिनवर फक्त एकाच संगणकावर नोंदी करता येत असल्याने काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही बाब राज्य व केंद्र शासनाच्या संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, त्यावर लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. नागरिकांना कमी त्रास व्हावा यासाठी प्रलंबित अर्जांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT