सिनियर भोंसला पॅलेस, महालच्या वाड्यात हा सर्वात मोठा ८ फुटी लाकडी बैल आहे Pudhari Photo
नागपूर

Tanha Pola Nagpur |२३६ वर्षांची परंपरा आणि ८ फुटी लाकडी बैल, नागपूरच्या भोसले वाड्यात तान्हा पोळ्याचा उत्साह

पिढ्यानपिढ्या जपली जातेय भोसले घराण्याची अनोखी परंपरा

पुढारी वृत्तसेवा

नागपूर -नागपूर शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे. यंदा लाकडी बैलांच्या (तान्हा ) पोळ्यास 236 वर्ष पूर्ण होत आहेत. भारत हा कृषी प्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा वेगवेगळ्या नावाने बैलांचा सण म्हणून साजरा केल्या जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात.

विशेष म्हणजे विदर्भ वगळता कुठेच हा पोळा होत नाही. सन 1789 मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी हा उत्सव सुरु केला. लहान बालगोपालांना बैलाचे महत्व कळावे म्हणून या लाकडी बैल (तान्हा ) पोळ्याची सुरुवात केली. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी यासाठी काही लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले.

जिवंत बैलाप्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे पानासोबत त्याला जिलेबी, फळं, आता चॉकलेट, बिस्कीट पुडे, अशा विविध वस्तूंनी तयार केलेले तोरण बांधून त्यामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा केली गेली. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटण्यात यायचे. या प्रथेला यावर्षी शनिवारी 236 वर्षे पूर्ण झाली. राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या सिनियर भोंसला पॅलेस, महालच्या वाड्यात हा सर्वात मोठा लाकडी बैल आहे. या लाकडी बैलांची उंची आठ फूट, लांबी सहा फूट असून पायात चांदीचा तोडा घातला आहे. आजही भोसले कुटुंबात तान्हा पोळा परंपरा कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT