

Nagpur 200-year-old Pola festival
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : नागपूर शहर हे देशाचे हृदयस्थळ असून अनेक अफलातून परंपरा जपणारे शहर आहे. पोळ्याच्या पाडव्याला नागपुरात पाणी लाकडी नंदी बैलांचा तान्हा पोळा ही दोनशेवर वर्षांची प्राचीन परंपरा आहे. आज या लाकडी नंदी बैलांच्या बाजारात 'मन्या भाई'ची जोरदार चर्चा होती. ऐकून नवल वाटेल पण या बैलाची किंमत आहे 3.91 लाख रुपये आहे.
लकडगंज टिंबर मार्केट, सक्करदरा, जुनी शुक्रवारमध्ये साधारणत 500 ते 4 लाख रुपये किंमतीपर्यंतचे लाकडी नंदी बैल आहेत. यावर्षी बाजारात उत्साह असून किमान 100 कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचे सांगितले जाते. हौसेला मोल नाही, असे म्हणत पालकही मुलांसाठी बैल घेऊन देतात.
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे 'पोळा'. तान्हा पोळा देखील 236 वर्षांची परंपरा आहे. लहान मुलांमध्येही बैलांबद्दल प्रेम व आपुलकीची भावना निर्माण व्हावी, याच उद्देशाने नागपूरकर भोसले राजघराण्यामध्ये लाकडी नंदी बैल पोळा म्हणजेच तान्हा पोळा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
सध्या राजे मुधोजी भोसले यांनी ती जपली असून हळूहळू नागपूरकरांनी देखील हा ऐतिहासिक वारसा जोपासला आहे. आज गल्लीबोळात नंदी बैल पोळ्यात आणि आकर्षक नंदी सजावट आणि वेशभूषा स्पर्धा सुरू झाली असून बालगोपालाना सोन्याची चेनपासून तर लाखो रुपयांची रोख बक्षिसे, सायकल अशी पारितोषिके दिली जातात. यावर्षी तर महापालिका निवडणुकीमुळे आयोजक, इच्छुक उमेदवार तरुणाईत मोठी चुरस पहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यातील सिंदि रेल्वे येथे मोठा तान्हा पोळा भरतो.
नागपुरसह पूर्व विदर्भातील विविध भागात ऐतिहासिक 'तान्हा' पोळ्याची लगबग सुरू आहे. आंब्याच्या लाकडापासून तयार केलेल्या आणि सहा फूट उंच या मन्या भाई नंदी बैलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आठ कारागिरांनी एका महिनाभरात या लाकडी बैलाची निर्मिती केलीय. त्याचबरोबर 1 लाख 91 हजार किंमतीचा 'सोन्या भाई' पण बाजारात उपलब्ध आहे.
याशिवाय या लकडगंज बाजारात शेकडो आकर्षक लाकडी बैल आहेत.शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर होतो. देशात फक्त पूर्व विदर्भात पोळ्याच्या पाडव्याला लहान मुलांच्या उत्साहासाठी लाकडी नंदी बैलांचा तान्हा पोळा भरतो. विविध लाकडांपासून सुबक आणि आकर्षक नंदी बैल वर्षभर तयार केले जातात. लाकडापासून तयार नंदी बैलांचीही मिरवणूक काढली जाते.
यावर्षी नंदी बैल विक्रीसाठी सज्ज झाले असून, 500 रुपये ते चार लाख रुपये किंमतीचे बैल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दरम्यान , लाकडी नंदी बैलांच्या किंमती जास्त असल्यानं आता बाजारात त्या तुलनेत स्वस्त आणि कुठलेही मेंटेनन्स नसलेले धातूंचे नंदी बैल विकीसाठी उपलब्ध आहेत.