nagpur snake news: नागपुरात आढळला दुर्मिळ प्रजातीचा 'चापडा' अतीविषारी साप
नागपूर: घनदाट जंगलात वास्तव्य करणारा आणि अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा 'चापडा' (Bamboo Pit Viper) हा अतिविषारी साप नागपूर शहरात पहिल्यांदाच आढळून आला आहे. भरतवाडा येथील एका रहिवासी घरात हा साप आढळल्याने सर्प अभ्यासकांमध्येही आश्चर्याचे वातावरण आहे. वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीच्या सतर्क सदस्यांनी या सापाला सुरक्षितरित्या पकडून जीवदान दिले आहे.
नेमके काय घडले?
गुरुवारी (दि.२१) सायंकाळी सुमारे साडेपाच वाजताच्या सुमारास, भरतवाडा परिसरात राहणारे विकास तुमसरे यांच्या घरातील वेलीवर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा साप दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीचे सर्पमित्र अभिषेक रहांगडाले यांना तातडीने फोन करून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अभिषेक रहांगडाले आणि त्यांचे सहकारी आकाश सोनकुले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता, तो नेहमी आढळणारा साप नसून एक वेगळ्याच प्रजातीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अधिक तपासणी केल्यावर तो अत्यंत विषारी असलेला 'चापडा' म्हणजेच 'बांबू पिट व्हायपर' साप असल्याची खात्री पटली. सुमारे अडीच फूट लांबीच्या या सापाला सर्पमित्रांनी अत्यंत कुशलतेने आणि सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर, पुढील प्रक्रियेसाठी त्याला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
काय आहे 'चापडा' सापाची ओळख?
वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटीचे सर्प अभ्यासक नितीश भांदक्कर यांनी या सापाविषयी अधिक माहिती दिली. त्यांच्या मते, हा साप सहसा मानवी वस्तीत आढळत नाही. हा साप प्रामुख्याने घनदाट जंगल, बांबूची वने आणि झाडीझुडपांमध्ये राहतो. 'चापडा' हा व्हायपर प्रजातीमधील असून, घोणस सापाच्या विषाएवढाच प्रभावी आणि जीवघेणा असतो. याच्या शरीराचा वरील भाग पूर्णपणे चमकदार हिरव्या रंगाचा असतो. पोटाखालचा भाग पिवळसर किंवा फिकट हिरवा असतो. डोके त्रिकोणी आकाराचे असते, जे व्हायपर प्रजातीचे वैशिष्ट्य आहे. हा साप अत्यंत लाजाळू असून, माणसाच्या संपर्कात येणे टाळतो.
हवामान बदल, कमी होणाऱ्या जंगलांमुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे
एरवी घनदाट अरण्यात राहणारा हा दुर्मिळ साप शहराच्या मध्यवस्तीत कसा पोहोचला, हा एक संशोधनाचा विषय आहे. बदलणारे हवामान आणि कमी होणारी जंगले यामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे आकर्षित होत असल्याचे हे द्योतक असू शकते. या घटनेमुळे वन्यजीव आणि मानवी वस्ती यांच्यातील बदलत्या समीकरणांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून, अशा परिस्थितीत घाबरून न जाता तज्ज्ञांची मदत घेणे किती महत्त्वाचे आहे, हे देखील अधोरेखित झाले आहे.

