बेशुद्ध आदित्यला चादरीत गुंडळून ठेवले
डॉक्टर मित्राचा निष्काळजीपणा धक्कादायक
भावाच्या तक्रारीनंतर कारवाई
Nagpur Bachelor Party Death Case: नागपूरमध्ये एका बॅचलर पार्टीदरम्यान ३३ वर्षाच्या आदित्य मोहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १६ नोव्हेंबरची आहे. या मृत्यूप्रकरणी खापा पोलिसांनी आदित्यच्या ११ मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. या ११ मित्रांपैकी एक हा डॉक्टर आहे. या मित्रांवर निष्काळजीपणाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
आदित्य आणि त्याचे इतर ११ मित्र हे बॅचलर पार्टी करत होते. या पार्टीदरम्यान आदित्य अचानक बेशुद्ध पडला. मात्र आदित्यच्या मित्रांनी आदित्यला वैद्यकीय मदत देण्याऐवजी त्याला तसंच चादरीत गुंडळून ठेवले. विशेष म्हणजे या मित्रांनी पार्टी तशीच सुरू ठेवली असा आरोप आदित्यच्या भावाने केला आहे.
मित्रांनी पार्टी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी १० नंतर आदित्यला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी डॉक्टरांनी आदित्यचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. गंभीर बाब म्हणजे आदित्यच्या या ११ मित्रांमध्ये एका डॉक्टर मित्राचा देखील समावेश होता. त्याने त्याची तपासणी केली नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे.
धक्कादायक बातमीनंतर स्टील व्यावसायिक असलेल्या आदित्यच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. मृत आदित्यचा भाऊ परीक्षित मोहिते यांनी या निष्काळची मित्रांविरूद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी या ११ मित्रांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मित्र आता जामीनासाठी प्रयत्न करत आहेत.