Accident Pudhari
नागपूर

Nagpur Accident News: जपानी गार्डनजवळ मॉर्निंग वॉकदरम्यान भरधाव कारची धडक; ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

तीन कार भरधाव वेगाने धावत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा; पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपूरच्या जपानी गार्डन परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव कैलास सोंडिया (रा. आवस्थी चौक, नागपूर) असे आहे. ते नेहमीप्रमाणे सकाळी जपानी गार्डन परिसरात फेरफटका मारत असताना ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, परिसरातून तीन कार भरधाव वेगाने जात होत्या. त्यापैकी एका इनोव्हा कारने कैलास सोंडिया यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघात नेमका कोणत्या कारमुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि भरधाव धावणाऱ्या इतर वाहनांचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT