नागपूर : महाराष्ट्राच्या विधी मंडळ समितीचा अभ्यास दौरा धुळे येथे होत असताना पैसे सापडले, ही घटना गंभीर आहे. यामुळे विविध समित्यांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते, असा सवाल काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी (दि.२२) उपस्थित केला. या समितीच्या कामकाज शुभारंभाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या तरी असे प्रकार घडत असतील तर या समिती संदर्भात सगळ्यांचे स्क्रिनिंग झाले पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
राज्यातील विविध प्रश्नावर काम करण्यासाठी समित्यांची नेमणूक होते. पण सध्या सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे. या समित्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर याचे कामकाज पारदर्शक पद्धतीने व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पावले उचलावीत. लोकप्रतिनिधीच्या दौऱ्यावर असे प्रश्न उपस्थित होत असतील तर अभ्यास दौरे करावे की करू नये, याबाबत विधानसभा अध्यक्ष, सभापती यांनी याबाबत लक्ष घालावे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधी बदनाम होतात त्याचा समितीच्या कामकाजावर परिणाम होतो.
दरम्यान, पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकार हा संतापजनक आहे. या प्रकरणात सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षातील नेते आहेत. कायद्याने कठोर कारवाई झाली पाहिजे. दोन कोटी रूपयांसाठी एका लेकीचा बळी जाणे, ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे यात जे कोणी दोषी आहेत त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात राजकीय नेते हुंडाबळीसाठी जबाबदार असतील तर याबाबत सरकारने अजून कडक धोरण बनवावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत सरकार पावले उचलत नाही.दुसरीकडे बोगस बियाण्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बोगस बियाणे बनवणारे आणि विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. यासाठी जास्त शिक्षेची तरतूद करणारा कायदा करावा, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.