

Vijay Vadettivar on Caste Census Decision
नागपूर: देशात जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि.३०) घेतला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही मागणी सातत्याने केली होती. मात्र, फक्त बिहार निवडणुकीपुरतीच ही घोषणा नसावी, असे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
ज्यांची जितकी संख्या त्यांची तितकी हिस्सेदारी या भूमिकेतून काँग्रेसची ही मागणी होती. सत्ताधाऱ्यांनी याला आधी विरोध केला होता. पण आज तडकाफडकी निर्णय झाला. उद्या बिहारची निवडणूक होऊ घातली आहे. म्हणून तर ही घोषणा नसावी.
ओबीसी समाज त्यांच्या हक्कापासून वंचित होता. जातीनिहाय जनगणना झाल्यावर तो हक्क मिळू शकेल. याकडेही वडेट्टीवार यांनी आवर्जून माध्यमांशी बोलताना लक्ष वेधले.
दरम्यान, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट हा टॅक्स फ्री करा, अशीही मागणी वडेट्टीवार यांनी आज राज्य सरकारकडे केली आहे.