Mongolian Siberian birds arrival Nagpur  Pudhari
नागपूर

Birds Migration in Nagpur | विदेशी पाहुणे पक्षी पोहोचले यंदा उशिरा नागपुरात

मंगोलिया आणि सायबेरियातून येणारे पक्षी यंदा नागपूरच्या परिसरात साधारण दीड ते दोन महिने उशिरा पोहोचले आहेत

पुढारी वृत्तसेवा

Mongolian Siberian birds arrival Nagpur

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : सध्या नागपूरमधील विविध तलावांवर परदेशी पक्षी पाहुण्यांची गर्दी झाली आहे. स्थलांतरित पक्षी आणि संवर्धनाची गरजही यानिमित्ताने व्यक्त होत आहे. ​विशेष म्हणजे मंगोलिया आणि सायबेरियातून येणारे पक्षी यंदा नागपूरच्या परिसरात साधारण दीड ते दोन महिने उशिरा पोहोचले आहेत.

यामागील ​विलंबाची प्रमुख कारणे लक्षात घेता हवामान बदल, स्थलांतराच्या मार्गातील चक्रीवादळे, दीर्घकाळ झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे तलावांमधील पक्ष्यांच्या अन्नाचे (Foraging beds) स्त्रोत पाण्याखाली जाणे,याशिवाय यावेळी उशिरा सुरू झालेली थंडी यामुळे भारतीय उपखंडातील पक्ष्यांचे स्थलांतर विखुरलेले पाहायला मिळत आहे.

सध्या नागपूरच्या परिसरातील विविध तलावांवर बार-हेडेड गूस (पट्टकादंब), नॉर्दर्न पिनटेल (तलवार बदक), रेड-क्रेस्टेड पोचार्ड (लालसरी), कॉटन पिग्मी गूस (नदी सुरी), लेसर व्हिसलिंग डक (शिटी बदक), फेरुगिनस डक (लोहसरी) आणि इतर पाणपक्षी दाखल झाले आहेत. जलचरांव्यतिरिक्त इतर हिवाळी स्थलांतरित पक्षीही नागपूर जिल्ह्याच्या परिसरात गोरेवाडा,हळदगाव आणि इतर तलावांवर दिसून येत आहेत.

​संवर्धनासाठी महत्वाचे काय ?

​नागपूर जिल्ह्यातील प्रमुख तलावांचे पुनरुज्जीवन करणे आणि स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी पीक फेरपालटाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. पक्षी तज्ञांनी उत्स्फूर्तोने घेतलेल्या पुढाकाराला महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आणि नागपूर वन विभाग यांचीही साथ मिळणे आवश्यक आहे. ​मात्र खेदाची बाब म्हणजे स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समिती (BMC), ज्याचे अध्यक्ष महानगरपालिका आयुक्त असतात, त्यांची अद्याप एकही बैठक झालेली नाही.

तत्कालीन आयुक्त विमला राव यांनी गेल्या बैठकीत नागपूर वनविभागाच्या १४ परिक्षेत्रांतील (Ranges) प्रत्येकी १ तलाव पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. जर हे काम युद्धपातळीवर केले गेले नाही, तर पुढील १-२ वर्षांत आपण पाणथळ जागी असणारी ही समृद्ध जैवविविधता नक्कीच गमावून बसल्याशिवाय राहणार नाही. परिणामी, पुढच्या पिढीला हे पक्षी फक्त पुस्तकातील चित्र आणि फोटोंमध्येच पाहावे लागतील अशी खंत ​अविनाश लोंढे पक्षीशास्त्रज्ञ, संशोधक आणि मानद वन्यजीव रक्षक (CT), प्रा. जगदीश बोरकर, शासकीय विज्ञान संस्था यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT