Bird Migration Season Konkan | पक्षी आगमनाचा हंगाम आणि पर्यटन

कोकणात पर्यटन वाढणे हा शुभसंकेत आहे. या प्रदेशाच्या विकासाचा रथ पर्यटनातून पुढे जाऊ शकतो. त्यासाठी राजाश्रयाची गरज आहे.
Pudhari Editorial Article
पक्षी आगमनाचा हंगाम आणि पर्यटन(Pudhari File Photo)
Published on
Updated on

शशिकांत सावंत

पावसाळा संपला की, कोकणात सागरी पर्यटनाला सुगीचे दिवस येतात. कोकण हा 720 कि.मी.ची किनारपट्टी म्हणजे परशुरामाने समुद्र हटवून निर्माण केलेला भूप्रदेश, असे मानले जाते. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांना लाभलेली किनारपट्टी म्हणजे, कोकणचा भूप्रदेश हिवाळी पर्यटनाचे केंद्र आहे. या प्रदेशात हिवाळ्यात 343 जातीचे पक्षी दाखल होतात. यात सीगल, फ्लेमिंगो, युरोशीयन टॉर्स, प्रॉटक, हुरड्या, ब्नाहेडेड गर्ल्स, शेराटी असे काही प्रमुख पक्षी आहेत. हे पक्षी पर्यटनाचे केंद्र बनू लागले आहेत.

पालघरमधील डहाणू, बोर्डी, सातपाटी, केळवे तसेच रायगडमधील मांडवा, किहीम, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, आगरदांडा, वर्सोली, रत्नागिरीतील हर्णे, दाभोळ, गणपतीपुळे, मुसाकाझी, सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग, देवगड, तांबळडेग, आचरा, देवबाग, तारकर्ली, निवती, शिरोडा, वेळागर असे समुद्र किनारे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत. दिवाळी सुट्टीत सुरू होणारे हे सागरी पर्यटन मे महिन्यापर्यंत दमदारपणे सुरू राहते. कोकणात अलीकडच्या काळात या किनार्‍यांना 25 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिल्याची आकडेवारी पर्यटनवाढीचा दाखला देत आहे. स्वच्छ समुद्रकिनारे आणि हरखून जाणारे निसर्ग सौंदर्य, सोनेरी, रूपेरी वाळू, निळेशार समुद्राचे पाणी यामुळे एकेकाळी पर्यटनाचे केंद्र असलेल्या गोव्यापेक्षाही कोकणला पर्यटकांची पसंती अधिक मिळू लागली आहे.

मात्र, आजही सुविधांच्या बाबतीत कोकण मागे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन स्थळे तयार करण्याचा संकल्प 1999 ला कोकणचे नेते नारायण राणे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने केला होता. यासाठी कोकण पर्यटन महामंडळ स्थापन करून पर्यटन विकासाला गती देण्यात आली. टाटा कन्सल्टन्सी या संस्थेने कोकणच्या सागरी पर्यटन स्थळांचा अभ्यास करून 35 पर्यटन स्थळे शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटने स्थळे निर्माण करण्यासंबंधीचा आराखडा तयार केला. राज्य सरकारला त्यावेळी तो सादरही करण्यात आला होता. मात्र, या विकास आराखड्यावर पुढच्या सरकारने सकारात्मक द़ृष्टिकोन न दाखवल्याने हा विकास आराखडा तेथेच थांबला आणि यथावकाश कोकणचे पर्यटन महामंडळही गुंडाळले गेले. त्यानंतर पर्यटन सुविधा निर्मितीसाठी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना एका विशेष पॅकेजची घोषणा झाली; पण ही घोषणाही निवडणुकीपुरतीच मर्यादित राहिली. पॅकेजचे पैसे आलेच नाहीत. आता पर्यटन वाढू लागल्याने सुविधांची उणीव कायम भासू लागली आहे. कोकणच्या पर्यटन वाढीच्या सुविधा अधिक गतिमानपणे केल्या गेल्या तसेच जलवाहतुकीच्या योजनांची अंमलबजावणी अधिक कार्यक्षमतेने झाली, तर हा पर्यटनाचा विस्तार आणखी होऊ शकणार आहे.

Pudhari Editorial Article
Pudhari Editorial : वर्चस्वाचा खेळ!

कोकणच्या मातीतील लोककला म्हणजेच दशावतार नव्या रूपात आणून पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचीही संकल्पना त्या काळात मूर्त रूप घेत होती; पण त्यावर पुढे काही घडू शकले नाही. अलीकडेच गाजलेल्या ‘दशावतार’ चित्रपटामुळे कोकणची लोककला आणि इथला निसर्ग या विषयावर काही ना काही चर्चा घडू लागल्या आहेत. पण, या चर्चा मूर्त रूप घेत नसल्याने हा विकासाचा गाडा तेथेच थांबलेला दिसतो. खरं तर इथला निसर्ग वाचवून इथल्या पर्यटनाची व्याप्ती वाढवणे सहज शक्य आहे. यातून कोकणचे अर्थकारण बदलण्याची ताकद निर्माण होऊ शकते. मात्र, त्यासाठी गोव्याप्रमाणे राज्य सरकारने सुविधा देणे अधिक गरजेचे आहे.

कोकणात वाढू लागलेले पर्यटन, महाराष्ट्रासाठी शुभशकुन आहे. कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे. या प्रदेशाचा विकासाचा रथ पर्यटनातून पुढे जाऊ शकतो, असे शुभसंकेत वाढत्या पर्यटनातून मिळत आहेत. या शुभ संकेतांचा फायदा घेऊन पुढे जाण्यासाठी राजाश्रयाची गरज आहे. विकासाच्या पंखांना नवे बळ देऊ शकणार्‍या या सुवर्णभूमीच्या मार्गक्रमणाला गतिमान करण्यासाठी इथल्या पर्यटनाची व्याप्ती अधिक विस्तारून एक नवा आयाम दिला गेला, तर कोकणभूमी पर्यटनभूमी म्हणून उदयाला येईल, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news