Defense Nuclear Aerospace Corridor  (File Photo)
नागपूर

Saoner DNA Corridor | सावनेर येथे प्रस्तावित 'डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉर' भूसंपादनास मंजुरी

आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मानले मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार

पुढारी वृत्तसेवा

Defense Nuclear Aerospace Corridor Nagpur

नागपूर : मुंबईत मंत्रालयात झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे प्रस्तावित डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस (DNA) कॉरिडॉर प्रकल्पासाठी लागणाऱ्या एमआयडीसी येथील भूसंपादनास मंजुरी दिली आहे. प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या 186 व्या भूसंपादन बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

या प्रस्तावानुसार, सावनेर औद्योगिक क्षेत्र, ता. सावनेर, जि. नागपूर येथे सुमारे खाजगी 2601.2091 हेक्टर व सरकारी 120.74 हेक्टर मिळून एकूण 2721.9491 हेक्टर क्षेत्र (म्हणजेच 6725.98 एकर) भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जमीन संपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 अंतर्गत प्रकरण 6 व कलम 2 (ग) मधील तरतुदी लागू करण्यात येणार आहेत.

प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये एरोस्पेस (विमान, ड्रोन, उपग्रह भाग), डिफेन्स उत्पादन (शस्त्रे, मिसाइल, ॲम्युनिशन), न्यूक्लिअर संबंधित तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि प्रगत अभियांत्रिकी उद्योग विकसित करण्यात येणार असून, सावनेर भविष्यातील महत्त्वाचा औद्योगिक हब म्हणून विकसित होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भरता आणण्याकरिता 'रक्षा कॉरिडॉर' (डीएनए) देशामध्ये तयार केले जात आहे. उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉर, तामिळनाडू डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉर ही दोन उदाहरणे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारकडून प्रस्तावित 'रक्षा कॉरिडॉर' (डीएनए) मध्ये अमरावती, वर्धा, नागपूर आणि सावनेरचा समावेश करून संरक्षण मंत्र्यांना यासाठी प्रेझेंटेशन देऊन विनंती करण्यात आली होती.

भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी हा प्रकल्प सावनेर येथे सुरू करावा, यासाठी सुरुवातीपासूनच केंद्र, राज्य सरकारकडे सातत्याने प्रयत्न केले. यासाठी त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांना 22 ऑगस्ट 2025 ला पत्राद्वारे मागणी देखील केली होती.

विदर्भाच्या दृष्टीने या प्रस्तावित प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होणार, स्थानिक युवकांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार, नागपूर व विदर्भाचा औद्योगिक विकास वेगाने होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT