

Nagpur Explosives Found
नागपूर : गणेशपेठ पोलिस स्टेशन हद्दीत वर्दळीच्या दोसर भवन चौक परिसरात लांजेवार यांच्या इमारतीच्या ओपन स्पेसमध्ये मंगळवारी (दि.७) एक संशयास्पद वस्तू आढळून आल्याने बॉम्ब शोधक, नाशक टीम आणि मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
एका पिशवीत 58 डिटोनेटर, 15 जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्याने घटनास्थळी खळबळ उडाली. घर मालकानेही आपल्याला ही पिशवी असल्याची बाब आजच समजल्याचे सांगितल्याने आता हा साठा आला कुठून याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे आहे.
पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. पेसो, बॉम्बशोधक नाशक यंत्रणा याचा शोध घेत असून एकाचवेळी 58 डिटोनेटर,15 जिलेटीनच्या कांड्या कुणी आणून ठेवल्या याचा मागोवा पोलिस घेत आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत महाल गांधीगेट परिसरात दोन गट अमोरासमोर आल्याने जाळपोळ, दगडफेक, हिंसाचारात मोठा तणाव निर्माण झाला.
जवळच महाल संघ मुख्यालय, मोमीनपुरा परिसर आहे. त्यावेळी सेंट्रल एव्ह्येन्यू वर हा भाग हिंसाचाराचा केंद्रबिंदू असल्याने आजच्या या घटनेचा काही परस्पर संबंध असू शकतो का, हे आता पोलिस यंत्रणा पडताळून पाहत आहेत. सध्याच काहीही बोलता येणार नाही. यासाठीच शोधमोहीम जोरात असल्याची माहिती पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.