Orange Processing Center Katol
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्प एमएआयडीसीकडे सोमवारी (दि.१४) हस्तांतरीत करण्यात आला. यावेळी सर्वांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला. एमएआयडीसीला प्रकल्प चार आठवडयात हस्तांतरीत करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने दिला होता.
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन आज (दि. 14) हा प्रकल्प सलील देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. हा प्रकल्प पूर्जिवीत करण्यासाठी 15 कोटी रुपयांची आवश्यकता असून आपण कृषीमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सलील देशमुख यांनी यावेळी सांगितले. एमएआयडीसीने त्यांचा हा प्रकल्प चालविण्यासाठी नांदेडच्या सांयटेक्निक इं.प्रा.लि. कंपनीला दिला होता. संत्रा प्रक्रिया होवून काटोल व नरखेड तालुक्यासह विदर्भातील संत्रा उत्पादकांना याचा फायदा व्हावा, या दृष्टीकोणातून संबंधित कंपनी कोणतेही काम करीत नव्हती.
हाच मुद्दा घेऊन माजी मंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयीन लढाई सुरु केली. परंतु, दरम्यानच्या काळात ते अडचणीत असतानाही सलील देशमुख यांनी अनिल देशमुख यांनी सुरु केलेली लढाई पुढे सुरुच ठेवली. अनेक वेळा एमएआयडीच्या कृषी उदयोग भवन मुंबई येथे कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठकी घेतल्या.
हा संत्रा प्रक्रिया प्रकल्प तत्काळ सुरू झाल्यास संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, फळांना योग्य भाव मिळेल, बेरोजगार युवकांना रोजगार मिळून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पहिल्या टप्प्यात ग्रेंडींग व पॅकिंग शक्य आहे. तर दुसऱ्या टप्प्यात संत्रा व इतर फळांवर प्रक्रिया करून इतर उत्पादने सुरू करता येऊ शकतात, यावर भर दिला. एमएआयडीसीचे अधिकारी तसेच संत्रा उत्पादक शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.