

Rain Subsides Nagpur
नागपूर: गुरु पौर्णिमेदिवशी आज (दि.१०) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नागपूर हळूहळू पूर्व पदावर येत आहे. उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा एकदा सावरण्याच्या प्रयत्नात झोपडपट्टीवासी आहेत. तर रस्ते खुले झाले असून वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे.
दरम्यान, पुढल्या वर्षी कुठेही पाणी तुंबणार नाही. पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, असा दावा महापालिका, जिल्हा प्रशासनामार्फत केला गेला. मात्र, मंगळवारी मध्यरात्रीपासून गुरुवारपर्यंत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हे सर्व दावे फोल ठरवत पावसाळी पूर्व नियोजनाचे पितळ उघडे पाडले.
यंदाही अनेक सखल वस्त्या जलमय झाल्या. तिघांचा मृत्यू झाला. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्याची वाताहात झाली. रेल्वे स्थानकावर पाणीच पाणी झाल्याने अनेक रेल्वे गाड्यांना व प्रवाशांना फटका बसला. टेकडी रोड देखील पाण्यात असल्याने रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडाली.
या तीन दिवसांत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मेयो येथील निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहात पाणी शिरले. विद्यार्थ्यांची धावपळ झाली. इकडे मेडिकलच्या दुसऱ्या मजल्यावर वार्डामध्ये पाणी गळत असल्याने रुग्ण इतरत्र हलवावे लागले. अलीकडेच करण्यात आलेले वॉटर प्रूफिंग देखील कुचकामी ठरले. नागपूर विभागात एसटीच्या 416 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
नागपूर विभागात घाट रोड, गणेश पेठ, उमरेड, काटोल, रामटेक, सावनेर, इमामवडा, वर्धमान नगर या आगारांचा प्रभावित झालेल्या आगारांमध्ये समावेश आहे. फेऱ्या रद्द झाल्याने जवळपास सात लाख 26 हजार रुपयांचा भुर्दंड एसटीला बसला. मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर पाणी आल्याने मुंबई हावडा दुरंतो, धनबाद एक्सप्रेस, हावडा पुणे, हावडा अहमदाबाद, हावडा मुंबई दुरांतो, चेरापल्ली स्पेशल, शालिमार एक्सप्रेस, मुंबई मेल, ओखा साप्ताहिक एक्सप्रेस या गाड्या काही काळ खोळंबल्याने प्रवाशांचे नियोजन कोलमडले.