Heavy rains lashed many parts of Nagpur
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे शनिवारी दुपारी नागपूरकर कडक उन्हाच्या झळांनी त्रस्त असतानाच अचानक वादळ वाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. उन्हाळ्यात पावसाळा असा काहीसा विचित्र अनुभव नागपूरकरांना अनुभवास आला. शांतीनगर, पारडी परिसरात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला.
अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने नागपूरकरांना उष्णतेपासून काहीसा सुखद गारवा दिला. मात्र काही वेळातच पुन्हा सूर्यदेवाने आपले उग्र रूप दाखविले. ही स्थिती एप्रिल सोबतच मे महिन्यात देखील कायम असल्याचे चित्र आहे. प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मे महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
गुजरात, राजस्थान, बिहार, झारखंड, ओडिसामधील काही भाग वगळता संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यात विदर्भाचाही समावेश आहे. मे महिन्यात विदर्भात कमाल तापमानाच्या तुलनेत किमान तापमानात अधिक वाढ होईल असा अंदाज आहे.
विदर्भाच्या ईशान्य आणि आग्नेय भागात उष्ण दिवसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. एकंदरीत यंदाचा मे महिना विचित्र हवामानाचा असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यावेळी खरे पाहता मार्च महिन्यातच नागपूर तापले. नागपुरात मार्च महिन्यात दहा दिवस तर एप्रिल महिन्यात 23 दिवस तापमान 40° अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते.
यंदाचा उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडतील असे दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांचे तापमान हे यंदा खूपच वाढल्याचे दिसून येत आहे. वाढते शहरीकरण, वृक्षतोड, काँक्रीटीकरण यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. यामुळे उन्हाळ्यात मोठा पाउस आणि पावसाळ्यात पर्जन्यमानात खंड पडणे. कमी वेळात अधिक पाउस पडणे यासारख्या घटना निसर्गातील बदललेल्या चक्राचे परिणाम आहेत. त्यामुळे निसर्गाचे चक्र अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी वृक्षारोपण, जंगली उच्छादन वाढवणे गरजेचे आहे.