नागपूर

नागपूरसह विदर्भाला अवकाळीचा तडाखा; रब्बी पिकांना फटका

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : उपराजधानीत हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात असताना नागपुरात सोमवारपासून पावसाळी वातावरण आहे. आज (दि.२८) सकाळपासून दुपारपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नागपूर, गोंदिया, बुलढाणा, अमरावती आणि अकोला या प्रामुख्याने पाच जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झाले आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावलेली आहे. आगामी दोन ते तीन दिवस वातावरण याचप्रमाणे राहील, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. या पावसामुळे शेतीचे, रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने आज तातडीची बैठक बोलावली आहे.

विदर्भात अनेक भागात यंदा पेरण्या उशिराने झाल्या. त्यामुळे पिकांच्या काढणीलाही उशिर झाला. या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रामुख्याने कपाशी, तूर, सोयाबीनला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. यवतमाळमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागपुरातही रात्रीपासून रिमझिम तर आज सकाळी जोरात पाऊस सुरु असल्याने वातावरणात गारठा निर्माण होऊन तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे.

विदर्भ व मराठवाड्यासह अनेक भागात अवकाळीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारकडूनही अवकाळी पावसाची माहिती मागविण्यात आली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT