Chandrashekhar Bawankule  Pudhari
नागपूर

Chandrashekhar Bawankule | शेतकरी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच पूर्ण होणार : चंद्रशेखर बावनकुळे

शेतकऱ्यांना शेतरस्ते तातडीने मिळणार

पुढारी वृत्तसेवा

Farmer Loan Waiver Beneficiary List

नागपूर : मामलेदार कोर्ट कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांमुळे शेतरस्ते, वहिवाटीचे रस्ते आणि पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावरील अडथळ्यांसंदर्भातील प्रकरणांचा अवघ्या तीन महिन्यांत निपटारा करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.

बावनकुळे म्हणाले की, सुधारित कायद्यानुसार संबंधितांना नोटिसा ई-मेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शेतरस्ता किंवा पाण्याचा प्रवाह अडविण्यात आल्यास संबंधित शेतकऱ्यांना मोफत पोलिस संरक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांत राज्यातील वहिवाटीच्या रस्त्यांचे बहुतांश प्रश्न निकाली काढण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावर टीका करताना आपण "नौटंकी" हा शब्द वापरला होता. ही टीका विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर नव्हती. विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार असून त्यांच्या आंदोलनाचा आपण कधीही विरोध केलेला नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, काही राजकीय नेते विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर राजकीय हेतूंसाठी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विद्यार्थी आंदोलकांशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सरकारवर विश्वास व्यक्त केला असून या प्रश्नात पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी केंद्र सरकार आवश्यक उपाययोजना करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकार गंभीर

पेपरफुटीच्या घटनांकडे केंद्र सरकार अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक आणि विद्यार्थ्यांचे हित सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार असून, पेपरफुटीविरोधात कठोर कायद्याबाबतही केंद्र सरकार लवकरच निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दोषींवर कठोर कारवाई होणार

मुंबईतील आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांशी गैरवर्तन आणि विनयभंग झाल्याच्या आरोपांबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीच्या याद्या लवकरच पूर्ण

राज्य सरकारचा कर्जमाफीचा निर्णय कायम असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने अंतिम केल्या जात आहेत. येत्या पंधरा दिवसांपासून महिनाभराच्या कालावधीत सर्व याद्या पूर्ण होतील आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT