

सोलापूर : शहरातील वर्ग दोन (बी-२) सत्ता प्रकारातील मिळकतींवरील मालकी हक्कांवरील बंधने शिथिल झाली. या जमिनी फ्री होल्ड करण्याची तांत्रिक बाब शासन विचाराधीन होती, त्यावर शिक्कामोर्तब झाले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (दि.९) विधानसभेत याची घोषणा केली. या कामासाठी आ. देवेंद्र कोठे यांनी पाठपुरावा केला. निर्णयानंतर आ. कोठे समर्थकांनी त्यांच्या कार्यालयासमोर जल्लोष केला. दरम्यान, ९ हजार कुटुंबांना, म्हणजेच जवळपास ४० हजार नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
आ. देवेंद्र कोठे हे आमदार झाल्यापासून त्यांनी शहरातील ८१३ मिळकतीं व चाळींवरील बी-२ सत्ताप्रकार हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी दीड वर्षात अनेक बैठका झाल्या. सर्वात महत्त्वाची बैठक मंगळवारी (दि.७) मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी रहिवास क्षेत्रासाठी २.५ आणि व्यावसायिकसाठी ५ टक्के रक्कम भरून मिळकतींवरील बी-२ हटविण्याचा निर्णय झाला. शंभर वर्षांपासून बी-२ सत्ताप्रकार कमी होण्याची वाट पाहणाऱ्या मिळकतदार, कामगारांना यामुळे दिलासा मिळाला आहे. सोलापुरात ८१३ बी-२ जमिनी आहेत. यामध्ये गृहनिर्माण संस्था व चाळी आहेत. जुनी मील चाळ, पाटील चाळ, वारद चाळ, नरसिंग गिरजी चाळ, लक्ष्मी विष्णू चाळ यासह छोट्या मोठ्या १३ चाळींचा यामध्ये समावेश आहे.
शहरातील १३ चाळी व मिळकतींचा बी-२ चा प्रश्न मार्गी लागल्यानंतर सोलापुरात आनंदाचे वातावरण पसरले. आ. देवेंद्र कोठे यांच्या मॅकेनिकी चौकातील कार्यालयासमोर त्यांच्या समर्थकांनी तसेच चाळीतील रहिवाशांनी गर्दी केली. महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वात गुलालाची उधळण करीत, पेढे वाटत जल्लोष करण्यात आला. यावेळी ढोल - ताशांच्या गजरावर नेते कार्यकर्त्यांनी ठेका धरला. यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नगरसेवक विनोद भोसले, बिज्जू प्रधाने, प्रशांत पल्ली, माजी नगरसेवक दीपक राजगे, मंगला कोल्हे, नागेश खरात यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.