Due to the rains, the electricity demand in the state decreased by 12 thousand megawatts
राज्यात पावसामुळे विजेच्या मागणीत घट  File Photo
नागपूर

पावसामुळे विजेची मागणी राज्यात १२ हजार मेगावॉटने घटली

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा

राज्यात काही भागात झालेल्या दमदार पावसाने सतत कामावर असलेल्या कुलर, एसी, पंख्यांना काहीशी उसंत मिळाल्याने विजेची मागणी 12 हजार मेगावॉटने घटली आहे. मागच्या आठवड्यापर्यंत विजेची मागणी २३ हजार मेगावॉट होती. जी शुक्रवारी २१ हजार मेगावॉटपर्यंत खाली आली. राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात ती २९ ते ३० हजार मेगावॉट होती. त्यानंतर काही भागात पाऊस झाल्याने ही मागणी १० जूनला २३ हजार मेगावॉटपर्यंत खाली आली.

शुक्रवारी महावितरणकडे १८ हजार ९५ मेगावॉट आणि मुंबईसाठी ३ हजार १५४ मेगावॉट मागणी नोंदवण्यात आली. दरम्यान, मागणीच्या तुलनेत विविध शासकीय व खासगी प्रकल्पातून राज्याला १४ हजार ३४८ मेगावॉट वीज मिळत होती. विजेच्या मागणीत मोठी घट झाल्याने महानिर्मितीसह खासगी कंपन्यांना काही वीजनिर्मिती संच बंद ठेवावे लागले आहेत. १२ जुलैला दुपारी २.३० वाजता सर्वाधिक ५ हजार ७५ मेगावॉट वीज महानिर्मितीकडून मिळत होती. यातील ४ हजार ७६९ मेगावॉट औष्णिक प्रकल्पातून, २५५ मेगावॉट उरण गॅस प्रकल्पातून, ४९ मेगावॉट सौर ऊर्जेतून मिळाली.

खासगी प्रकल्पांपैकी अदानीकडून १ हजार ८०८ मेगावॉट, जिंदलकडून ७३८ मेगावॉट, आयडियलकडून १७२ मेगावॉट, रतन इंडियाकडून १ हजार ३७ मेगावॉट, एसडब्ल्यूपीएलकडून ४५४ मेगावॉट वीज राज्याला मिळत होती. केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला ६ हजार ३८३ मेगावॉट वीज मिळत होती. महावितरणकडून यंदा उन्हाळ्यात १७ एप्रिल २०२४ रोजी सर्वाधिक २५ हजार ६८ मेगावॉट विजेची मागणी नोंदवली गेली. २७ फेब्रुवारीला २५ हजार २३ मेगावॉट, २७ मार्चला २५ हजार ३५ मेगावॉट, १९ एप्रिलला २४ हजार ८०५ मेगावॉट, २२ मे रोजी २४ हजार ६०४ मेगावॉट, ३ जूनला २४ हजार ४४३ मेगावॉट विजेची मागणी नोंदवली गेली. नागपूरसह पूर्व विदर्भात मात्र अजूनही पावसाची दमदार प्रतीक्षा असल्याने कुलर, पंख्यांची घरघर सुरूच आहे.

SCROLL FOR NEXT