पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताच्या नैऋत्य भागांत मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. दरम्यान मुंबई, ठाण्यासह कोकणात मान्सून सक्रिय स्थिती पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पश्चिम किनारपट्टीवर तीव्र ढग दाटले आहेत. त्यामुळे पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने सर्तकता बाळगण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील ३ ते ४ तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्रातील घाट भागात निर्जन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तर काहीठिकाणी एकाकी अतिवृष्टी देखील होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नैऋत्य भारतात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि.१३ जुलै) आणि रविवारी (१४ जुलै) राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात रेंड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान या भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टीची (204.4 पेक्षा कमी) शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यातील बहुतांशी भागात मान्सून सक्रियतेची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती डॉ. के. ए. होसाळीकर यांनी एक्स पोस्ट करत दिली आहे. होसाळीकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यात पुढील ४ ते ५ दिवस #मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकण आणि घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.