नागपूर : राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, तंबाखू आणि अमली पदार्थ विकणाऱ्यांवर तसेच राज्यात गुटखा तस्करी आणि विक्री करणाऱ्याविरोधात आता ‘मोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी कायद्यात बदल करून अशा प्रकरणांमध्ये ‘मोका’ लावण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
आमदार प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख, अमीन पटेल यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री आणि वाहतुकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मोका’ लागू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, धमकी आणि इजा पोहोचविणे या दोन कृती या प्रकरणात घडत नसल्याने ‘मोका’ लावता येणार नसल्याचा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला. मोका कायद्यात संघटितपणे धमकी देणे तसेच सामूहिकरीत्या इजा पोहोचविणे या बाबी आवश्यक ठरतात. त्यामुळे या कायद्यातच बदल करत गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही ‘मोका’ लागू करता येईल, अशा दुरुस्त्या कायद्यात करण्याची सूचना केली आहे. या सुधारणांनंतर हा कायदा अधिक कठोर करण्यात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. विद्यमान कायदे कमकुवत असल्याने गुटखा तस्करी करणारे लगेच जामिनावर सुटतात. त्यामुळे कायद्यात सुधारणा करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला.
राज्यात गुटखाबंदी आहे. गुटखा विक्री व वहनसंदर्भात राज्यभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली आहे. शाळा किंवा महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात गुटखा विक्रीचे प्रकार आढळल्यास त्या परिसरातील टपऱ्या किंवा दुकानांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने केली जाणार आहे. तसेच ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्रांची आवश्यकता आहे. मुंबई महानगरमध्ये दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची कमतरता असून शासन यासंदर्भात आवश्यक पुढाकार घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अनेक गुन्हे नोंदवले
राज्यभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून विविध जिल्ह्यांमध्ये एकूण शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात नवी मुंबईत 1 हजार 144, अहिल्यानगर येथे 185, जालना 90, अकोला 35, नाशिक 131, चंद्रपूर 230, सोलापूर 108, बुलडाणा 664 तसेच नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत 1 हजार 706 गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.