

Devendra Fadnavis bjp mla Abhimanyu Pawar: विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना चांगलीच समज दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वारंवार 'लाडक्या बहिणीं'चा उल्लेख केल्याने मुख्यमंत्री संतापले आणि त्यांनी आमदाराला थेट "घरी बसावे लागेल" अशा कडक शब्दांत सुनावले.
भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या समस्येवर सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना त्यांनी सतत लाडक्या बहिणी असा उल्लेख केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अभिमन्यू पवार यांना कडक शब्दांत समज दिली.
मुख्यमंत्र्यांनी "वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका," अशा शब्दांत त्यांनी आमदाराला फटकारले. मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी अतिशय कठोर शब्दात बजावले की, "लाडक्या बहिणींना प्रत्येक प्रकरणाशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल!"
विशेष म्हणजे, पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सभागृहातील विरोधकांनाही वारंवार 'लाडक्या बहिणीं'चा उल्लेख टाळण्यास सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना समज देऊनही, भाजपचेच आमदार अभिमन्यू पवार यांनी पुन्हा तोच उल्लेख केल्यामुळे मुख्यमंत्री संतप्त झाले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी अवैध दारू विक्री आणि गुटखा विक्रीवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही सभागृहात दिले.