

सांगली : येथील प्रभाग क्रमांक 9 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण दि. 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती पुतळा लोकार्पण समितीचे अध्यक्ष मनगू सरगर यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा लोकार्पण समितीची मंगळवारी बैठक झाली. भाजप नेत्या जयश्री पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, पुतळा लोकार्पण समितीचे अध्यक्ष मनगू सरगर, उपाध्यक्ष संतोष पाटील, रोहिणी पाटील, सचिव दत्तात्रय ठोंबरे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, मनोज सरगर, कल्पना कोळेकर, अतुल माने, बंडू सरगर, सचिन सरगर, रघुनाथ सरगर, सुरेश बंडगर, सचिन खांडेकर, दरिबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, रवींद्र ढगे, अमित पारेकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सुमारे दीड कोटी रुपये खर्चून अहिल्यादेवी यांचा अश्वारूढ पुतळा उभाण्यात आला आहे. सुमारे चार टन वजनाचा, 21 फूट उंचीचा व अश्वारूढ असलेला अहिल्यादेवी यांचा देशातील हा एकमेव पुतळा आहे.
अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे लोकार्पण दि. 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदार, नेते उपस्थित राहणार आहेत. महापालिकेच्यावतीने या कार्यक्रमाचे नियोजन होणार आहे. पुतळा लोकार्पण समिती बुधवारी आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी चर्चा करणार आहे. यानंतर पुन्हा समितीची बैठक होणार आहे. पुतळा लोकार्पण सोहळा सर्वपक्षीय असणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी दिली.