नागपूर : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी संविधान चौकात मोठे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रमुख अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी दीपके यांनी सरकारला इशारा देत, “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत आंदोलनकर्ते दिल्लीतून हटणार नाहीत,” असे ठामपणे सांगितले.
सायंकाळी चार वाजता सुरू झालेल्या आंदोलनासाठी संविधान चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनस्थळी मोठी गर्दी झाली असली तरी आंदोलकांनी वाहन वाहतुकीसाठी मार्ग मोकळा ठेवत शांततामय पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनाला प्रसिद्ध सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांनीही पाठिंबा दर्शविला.
उपस्थितांना संबोधित करताना अभिजित दीपके यांनी ‘नीट’ पेपरफुटीमुळे नागपूरच्या आकांक्षा चतुर्वेदी हिला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा उल्लेख केला. मात्र या घटनेनंतर सरकारमधील कोणत्याही नेत्याने तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.
“विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. जयपूरमध्ये माझ्यावर हल्ला झाला, पण माझ्यावर हल्ला करण्याऐवजी सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. २० जून रोजी देशभरातील युवक दिल्लीत एकत्र येतील आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असे दीपके म्हणाले.
देशातील शिक्षणव्यवस्था, बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘नीट’ पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणानंतर शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असेही ते म्हणाले.
‘हिंदू-मुस्लीम’ राजकारणावर टीका
यावेळी अभिजित दीपके यांनी देशातील हिंदू-मुस्लीम राजकारणावरही जोरदार टीका केली. “केवळ सत्तेसाठी सुरू असलेल्या या राजकारणामुळे युवकांना रोजगार मिळाला का? त्यांच्या जीवनात काय बदल झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशात बेरोजगारी वाढत असून शिक्षणव्यवस्था कोलमडत चालली आहे, मात्र या प्रश्नांवर चर्चा होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनात सहभागी झालेले नागरिक पाकिस्तानी?
“सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना ‘पाकिस्तानी’ ठरविण्याची प्रवृत्ती वाढली आहे. संविधान चौकातील आंदोलनात सहभागी झालेले नागरिक पाकिस्तानी आहेत का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी युवकांना धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला विरोध करण्याचे आवाहन केले. दरम्यान, आंदोलनापूर्वी अभिजित दीपके यांनी आकांक्षा चतुर्वेदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले.