Vilas Muttemwar Demand on Nagpur as second Capital
नागपूर : आज रोज देशाच्या सीमेवर, सीमेच्या आत विविध सीमावर्ती राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ल्याचा नापाक इरादा भारतीय सैन्य, वायुदल, नौदल उधळून लावत आहे. राजधानी दिल्लीत यापूर्वी थेट संसद परिसरात दहशतवाद्यांनी धडक दिली होती. या पार्श्वभूमीवर देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूरला देशाची पर्यायी राजधानी करा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना केली आहे.
क्रांतीभूमी चिमूर आणि नागपूरचे प्रतिनिधित्व केलेले, तब्बल 7 वेळा खासदार राहिलेले मुत्तेमवार यांनी स्वतः ही मागणी काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान आणि संसदेमध्ये यापूर्वी सन 2001, 2010 आणि 2011 साली अशी एकंदर तीनदा केलेली आहे. हे विशेष. गेल्या तीन चार दिवसांतील भारत- पाक युद्धजन्य स्थिती आणि परस्परांवर सुरू असलेली कुरघोडी, रोज होणारे नुकसान पाहता आजही ही मागणी तितकीच प्रासंगिक, समर्पक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युद्धजन्य, संभाव्य परिस्थितीत देशाच्या सर्वोच्च व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जगात प्रगत अमेरिकाच नव्हे. तर अनेक महत्वाच्या देशांमध्ये पर्यायी राजधानी बघायला मिळते. भारतात दिल्ली आज सर्वाधिक प्रदूषित शहर असून यापूर्वीचा दशहतवादी हल्ल्याचा इतिहास पाहू जाता हे शहर आणि आज पंजाबमध्ये दूरवर ज्या प्रमाणात ड्रोनच्या माध्यमातून हवाई हल्ले सुरू आहेत ही सर्व परिस्थिती बघता हे शहर असुरक्षित आहे. दुसरीकडे कधीकाळी मध्यप्रदेश, सीपी अँड बेरारची राजधानी असल्याने राजभवन व इतरही मूलभूत सुविधा असलेले नागपूर आज अपेक्षेपेक्षा अधिक पायाभूत सुविधांनी सज्ज झालेले आहे. यामुळेच याविषयीचा विचार तातडीने केला जावा, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. नागपूर हे देशाचे हृदयस्थळ असून ग्लोबल लोकेशन आहे. देशाच्या सीमांपासून नागपूर खूप सुरक्षित अंतरावर आहे.
पंजाब, राजस्थानपासूनच नव्हे तर पाकिस्तान, चीन, तिबेटपासूनही नागपूरचे अंतर बरेच लांब आहे. थेट युद्धाची झळ नागपूरला पोहोचू शकत नाही. याच पार्श्वभूमीवर 1962 साली भारत- चीन युद्धाच्यावेळी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण यांनी सर्वाधिक सुरक्षिततेच्या कारणावरून नागपूर परिसरात एकाचवेळी अंबाझरी, जवाहरनगर आणि चंद्रपूरला भद्रावती अशा तीन आयुध निर्माण करणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीची निर्मिती केली. आजही या ऑर्डनन्स फॅक्टरीचे देशाच्या सैन्यदलाला मोठे पाठबळ मिळत आहे. यामुळेच संभाव्य परिस्थिती लक्षात घेता, देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने नागपूरला देशाची पर्यायी राजधानी करा, यावरही मुत्तेमवार यांनी आवर्जून भर दिला.