

मालेगाव : मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानविरोधात जोरदार निदर्शने करत 'पाकिस्तान मुर्दाबाद' च्या घोषणा दिल्या. आम्ही भारतीय लष्करासोबत असून पाकीस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवतो. देशाच्या सुरक्षेसाठी विशेष दुआ मागितली जात असल्याचे देखील मौलाना यांच्याकडून सांगण्यात आले.
पाकिस्तानविरोधात भारत सरकार तसेच सैन्याकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी मालेगाव येथे 'एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेत सहभागी झालेल्या मुस्लिम समुदायाने 'हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
देशातील तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेत प्रशासकीय यंत्रणेकडून संवेदनशील ठिकाणी सावधगिरी बाळगण्यात येत आहे. भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ हिंदू - मुस्लिम बांधवांची एकजूट दिसत आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांकडूनही साथ मिळत आहे. संवेदनशील अशा मालेगाव शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत विविध पक्षांचे तसेच सामाजिक, धार्मिक संघटनांच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले.
यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा उंचावत ही यात्रा काढली. मालेगाव येथील मुशावरात चौकापासून सुरू झालेल्या यात्रेचा किदवाई रस्त्यावर समारोप झाला. भारताच्या स्वातंत्र्य युद्धात भारतातील मुस्लिम समुदायाने खांद्याला खांद्या लावून लढा दिला. आणि फाळणीच्या वेळी भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तानात न जाता हिंदुस्तानच्या भूमीलाच आपले मानले, असे यावेळी मौलाना मुफ्ती यांनी सांगितले. भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, भारताच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत रहावा, अशीच मुस्लिम पदायाची भूमिका असून भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने जी खंबीर भूमिका घेतली ती योग्य असल्याचे तसेच भारतीय लष्कर दाखवत असलेले शौर्य अभिमानास्पद असल्याचे मुफ्ती यांनी नमूद केले. या यात्रेत शफीक राणा, युसुफ इलियासी, सिकंदर अन्सारी, इत्तेशाद बेकरीवाले आदी बांधवांनी सहभाग नाेंदवला.