Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut
नागपूर : ठाकरे शिवसेनेने एकवेळ भाजपसोबत जाऊ पण शिंदे गटासोबत जाणार नाही, अशी काहीशी लवचिक भूमिका घेतली असताना “संजय राऊत यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसण्याचे स्वप्न पाहूच नये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री २०४७ पर्यंत एनडीए–भाजप महायुतीचेच असतील आणि ते मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरच कार्यरत राहतील, असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या जागा काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी आमचाच सर्वात मोठा पक्ष आहे.त्यामुळे अमरावती येथे महापौर हा भाजपाचा होणार असल्याची ग्वाही बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आमच्या जागा काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी भाजपच सर्वात मोठा पक्ष आहे. जागा का कमी झाल्या याचे चिंतन आणि तपास करण्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,महापौरपदाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, महापौर निवडीसाठी सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल आणि भाजपला बहुमत कसे मिळेल याचा निर्णय घेतला जाईल. “ज्यांना भाजपच्या महापौराला पाठिंबा द्यायचा आहे, त्यांचे स्वागत आहे. ज्यांची मर्जी आहे ते सोबत येतील, ज्यांची नाही ते येणार नाहीत. मात्र विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी विनंती आम्ही करणार आहोत.
भाजपचा महापौर असला तर केंद्र आणि राज्य सरकारकडून अमरावतीला मोठ्या प्रमाणात निधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमरावतीचा महापौर कोण होणार, याचा निर्णय राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कोअर कमिटी घेईल, असेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्या संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील जे पक्ष भाजपसोबत येतील त्यांना सोबत घेतले जाईल. बिहार भवनच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, विविध समाजांसाठी राज्यांमध्ये भवन उभारण्यात काहीही गैर नाही आणि समाज भवन उभारणीला कोणीही विरोध करू नये.