नागपूर

भाजप निवडणूक संकल्पपत्र: ३३ हजार कार्यकर्ते घरोघरी जाणार

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्राच्या दृष्टीने महाराष्ट्रातून १० लाख सूचना पाठविणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.२) पत्रकार परिषदेत दिली. राज्यभरातील ३३ हजार ३२३ भाजपा कार्यकर्ते सूचना पत्राची पेटी घेऊन घरोघरी पोहचणार असून सर्व सूचना भाजपा केंद्रीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहेत.

बावनकुळे पुढे म्हणाले की, ४ तारखेला नागपूर येथे राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरातील १८ ते ३५ वयोगटातील १ लाख युवक सहभागी होतील.

अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर

५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोला व जळगाव व संभाजीनगर येथील कार्यक्रमात उपस्थित राहणार असून ते अकोला येथे चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला व अमरावती या लोकसभा क्षेत्रातील निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी २ वा. जळगाव येथे युवा महासंमेलनात मार्गदर्शन करतील. सायंकाळी ६ वा. संभाजीनगर येथे अहमदनगर, शिर्डी, जालना व संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

नारी शक्ती वंदन कार्यक्रम

६ तारखेला राज्यातील सर्व २८८ विधानसभांमध्ये ५ हजार महिलांच्या उपस्थितीत नारीशक्ती वंदन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करतील.

दरम्यान, ७ ते १५ मार्च पर्यंत राज्यभर भाजपा कार्यकर्ते मागील १० वर्षांत मोदी सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नमस्कार पोहचविणार आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा व्हायरल व्हिडीओ खोटारडा असून याबाबत कॉंग्रेसला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. नागपूर लोकसभा ६५ टक्के मतांनी जिंकणार असा दावा करतानाच उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद नव्हे, तर मनभेद झाले आहेत. ठाकरेंची अवस्था हम दो हमारे दो अशी होणार आहे.

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, जिल्हा महामंत्री अनिल निधान उपस्थित होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT