नागपूर - मालवण येथील भाजप कार्यकर्त्याच्या घरात स्ट्रिंग ऑपरेशन करत पैसे सापडल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला. मात्र, ते पैसे व्यवहाराचे किंवा प्रॉपर्टीशी संबंधित असू शकतात. जर निवडणुकीत पैसे वाटप करताना कोणी पकडले गेले असते, तर निवडणूक आयोगाने तत्काळ दखल घेतली असता. त्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे आणले असतील, तर त्याबाबतचा तपास पोलिस आणि निवडणूक आयोग करतील. पण केवळ भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे सापडले, असे म्हणणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
बावनकुळे म्हणाले, “कोणाच्या घरात जाऊन स्ट्रिंग ऑपरेशन करणे किंवा बेडरूमपर्यंत जाण्याचे अधिकार आहेत का, हे तपासले पाहिजे. कोणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूट करणे हे नियमबाह्य आहे,” अशी माझी भूमिका आहे. सरकारमधील सर्व योजनांची मांडणी आम्ही करतो आणि निधी वाटपाचे अधिकार सरकारचेच आहेत. महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रितपणे निधी नियोजन करतात. यात 237 आमदार आहेत, त्यामुळे सर्वांना अधिकार आहेत. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. शरद पवार यांनी अनेक वर्षे सरकार चालवले, निधीचे वाटप केले आणि निवडणुका घोषणांच्या आधारे लढवल्या. त्यामुळे त्यांनी आमच्यावर निधीवाटपाबाबत टीका करणे योग्य नाही.
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील स्थानिक पातळीवरील छोट्या युतीवरून शशिकांत शिंदे यांनी आनंदी होण्याचे काही कारण नाही. स्थानिक स्तरावर अशा युती होतच असतात. याचा महायुतीशी काहीही संबंध नाही. आम्ही वरच्या स्तरावर समन्वय साधत आहोत. बावनकुळे म्हणाले की, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. गरीब आणि पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. तोपर्यंत कोणताही बँक किंवा संस्था कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावणार नाही.
दरम्यान,अंजली दमानिया यांच्या आरोपांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने खरगे समिती नेमली असून ती सखोल चौकशी करेल. यातून कोणीही सुटणार नाही. गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असून, अशा प्रकरणात वाहनांचा परवाना थेट निलंबित किंवा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बीड आणि अंबरनाथ येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याच्या घटनांचा उल्लेख करून ते म्हणाले की, अशा घटना स्थानिक निवडणुकांना गालबोट लावणाऱ्या आहेत. सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.