

वेलंग : धमकी कोणी आता देवू शकत नाही. तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. तुम्हाला कोणाचा धमकीचा फोन आला तर मला व ना. शिवेंद्रराजेंना फोन करा. मी नागपूरचा असलो तरी साताऱ्याची यंत्रणा हलवू शकतो. नगरपालिका क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे 55 प्रकारच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व योजना वाई शहरात प्रभावीपणे राबवण्यासाठी नागरिकांनी भाजपच्या पाठिशी रहावे. भविष्यात वाईकरांसाठी ड्रोनच्या साह्याने सर्वे करून भविष्यात प्रॉपर्टी कार्ड व वैयक्तिक प्रॉपर्टीचे सातबारे करून देणार आहे, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रेशेखर बावनकुळे यांनी दिली.
वाई येथील सोनगिरवाडी येथे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ना. शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी जिल्हाध्यक्ष व जिल्ह्याचे भाजपचे निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, अनिल सावंत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सुरभि भोसले, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, चिन्मय कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. बावनकुळे म्हणाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्तेत आहे. पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांना विजेचे बिल भरावे लागणार नाही, तर 30 जून 2026 पर्यंत गरीब शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्या थांबवणे आणि त्यांना स्थिरता देणे हा सरकारचा निर्धार आहे.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. बावनकुळे यांच्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. वाईचाही विकास साधण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. भाजपच्या पाठिशी राहिल्यास वाईला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही.
मदनदादा भोसले म्हणाले, वाई तालुक्यामध्ये प्रलंबित असणारा छ. शिवाजी महाराजांचा पुतळा, नाना-नानी पार्क हे प्रश्न अद्याप सोडवले नाही. डंपिंग ग्राऊंड वाई शहराजवळ आणून जिवंत अणुबॉम्ब आणून ठेवला आहे. शहरातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. शहरातून रोजगारासाठी स्थलांतर होत असून याकडे ना. मकरंद पाटील यांनी दुर्लक्ष केले आहे. वाईचा विकास साधण्यासाठी भाजप उमेदवारांच्या पाठिशी रहा, असे आवाहन मदनदादांनी केले.
अनिल सावंत म्हणाले, वाईतील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांत सुधारणा करण्यासाठी आम्ही अनेक योजना राबवल्या. परंतु, सध्या शहरातील विकासकामे ठप्प आहेत. नागरिकांना दहशत, आर्थिक प्रलोभने अक्षक्षाणि दबावाचा सामना करावा लागत आहे. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दीपक ननावरे यांनी केले. विजय ढेकाणे यांनी आभार मानले.