

मालवण : नगरपालिका निवडणुकांचे वातावरण तापले असतानाच शिवसेनेचे नेते आमदार नीलेश राणे यांनी बुधवारी सायंकाळी मालवण शहरातील भाजपच्या एका पदाधिकार्याच्या घरात जाऊन पैसे वाटपाचा आरोप करत लाईव्ह ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांना तत्काळ घटनास्थळी बोलावून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार नगरपालिकांच्या निवडणुका होत असून त्यामध्ये मालवण नगरपालिकेचा समावेश आहे. प्रचाराला केवळ चार दिवस शिल्लक असताना वातावरण तापत चालले आहे. मालवणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. शिवसेनेचे आमदार नीलेेश राणे यांनी बुधवारी सायंकाळी भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी गेले तेव्हा तिथे विजय केनवडेकर आणि कुडाळमधील भाजपचे कार्यकर्ते बंड्या सावंत उपस्थित होते. यावेळी त्यांनी लाईव्ह व्हिडीओ करत केनवडेकर यांच्या घरात एका पिशवीत पैशाची बंडले असल्याचे दाखविले. त्यानंतर पोलिस आणि निवडणूक यंत्रणेलाही फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांना आ. राणे यांनी पैशाची बंडले असलेली बॅग दाखवली.
कुडाळमधील भाजपच्या काही पदाधिकार्यांची नावे सांगत मालवण शहरात ते पैसे वाटत असल्याची तक्रार केली आणि पोलिस आणि निवडणूक यंत्रणेला पैशाची बंडले असलेली पिशवी ताब्यात घ्यायची मागणी केली. त्यानंत पोलिसांनी व निवडणूक अधिकार्यांनी पुढील कारवाई सुरू केली. बराचवेळ हे स्टिंग ऑपरेशन सुरू होते. त्यानंतर आमदार नीलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना असा आरोप केला की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेल्यानंतर मतदानासाठी पैसे वाटले जात आहेत.
केनवडेकर यांच्या या एकाच घरामध्ये आणखीही पैशाने भरलेल्या बॅगा आहेत. शहरातील अशा आठ-दहा घरांमध्ये अशा प्रकारे पैसे ठेवलेले आहेत. पोलिसांनी सर्च मोहिम राबवावी आणि पैशाच्या बॅगा जप्त कराव्यात. रवींद्र चव्हाण यांचा केनवडेकर यांच्या घरात फोटो आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. निवडणूक प्रचाराला आणखी चार दिवस शिल्लक असताना अशा पद्धतीने खुलेआम पैसे वाटत असतील तर उरलेल्या चार दिवसांत काय होईल? असा सवाल करत गुरुवारी आपण निवडणूक यंत्रणेचे कार्यालय आणि पोलिस स्टेशनला येऊन काय कारवाई केली? हा जाब विचारणार आहे, असा इशाराही त्यानी यावेळी अधिकार्यांना दिला.