Dhirendra Shastri Controversy Pudhari
नागपूर

बागेश्वर बाबा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अनादर केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना, त्यांच्या गाडीत आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा उलटी ठेवल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून बाबांवर टीकेची झोड उठत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वर बाबा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे एका सत्संग सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील एका आलिशान गाडीचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये गाडीच्या डॅशबोर्डवर किंवा दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा अत्यंत चुकीच्या पद्धतीने, म्हणजेच उलटी (शीर्षासन स्थितीत) ठेवलेली दिसत आहे. हा फोटो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर पसरला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटले.

वादग्रस्त विधानांची पार्श्वभूमी

बागेश्वर बाबा वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाष्य करताना काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती, ज्यावरून महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. त्या घटनेची शाई अद्याप वाळत नाही, तोच आता थेट महाराजांच्या प्रतिमेचा अशा प्रकारे अनादर झाल्याने शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.

शिवप्रेमी आणि राजकीय स्तरातून संताप

महाराजांच्या प्रतिमेचा अनादर झाल्याच्या भावनेतून विविध संघटनांनी बागेश्वर बाबांचा निषेध नोंदवला आहे. "ज्या महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्यांच्या प्रतिमेची साधी काळजी घेता येत नसेल, तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे," अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजले असून, शिवप्रेमींनी माफीची मागणी केली आहे. या घटनेनंतर मोहाडी परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर 'छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही' अशा आशयाचे पोस्ट्स व्हायरल होत असून बाबांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

पुन्हा एकदा वादाचे सावट

यापूर्वीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बागेश्वर बाबांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आता प्रत्यक्ष प्रतिमेचा अनादर झाल्याचे पुरावे समोर आल्याने, त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT